16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरेंकडून कोर्टात कोणतंही उत्तर नाही, अधिकची वेळ मागण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट-भाजपने युती करत सरकार स्थापन केलं. शिवसेनेतून अनेक आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच आम्ही खरे शिवसैनिक असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी व्हीप मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी याचिका शिवसेनेकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. दरम्यान,१६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षांना म्हणणं मांडण्यासाठी १२ जुलै आणि १९ जुलै अशी दोन वेळा मुदत दिली होती. मात्र, शिवसेनेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचं म्हणणं मांडण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे आपलं मत मांडण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टाकडून अधिकची वेळ मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे यांच्या बंडांनंतर १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाने आव्हान दिलं आहे. तर, ठाकरे सरकार कोसळल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचरण केले होते. तसेच विधानसभा निवडीची अनुमतीही देण्यात आली, याविरोधात शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षांना बाजू मांडण्यासाठी १२ जुलै आणि १९ जुलै अशी दोन वेळा मुदत दिली होती. मात्र, अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्यातर्फे अद्याप कोणतही उत्तर सादर करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे म्हणणं मांडण्यासाठी अधिकची वेळ शिवसेनेकडून
मागितली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचे स्पष्ट करतानाच यासाठी घटनापीठाची स्थापना करावी लागेल, असे सांगितले होते. याला काही कालावधी लागणार असून तोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका, अशी सूचना न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिलासा मिळाला. पण आता दोन्ही गटांच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.


हेही वाचा : शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी