घरताज्या घडामोडीआमदार अपात्रतेच्या आधी निर्णय नको, उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला आवाहन

आमदार अपात्रतेच्या आधी निर्णय नको, उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला आवाहन

Subscribe

शिवसेनेने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय घ्यावा. तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना ही एकच आहे, एकच होती आणि यापुढे एकच असणार आहे, असे स्पष्ट करताना ते १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणे हे नीचपणाचे आणि विकृत कृत्य आहे, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून अभूतपूर्व फूट घडवून आणली. आता शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि सेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. यासंदर्भातील वाद भारत निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लोकशाही वाचविण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन-तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष दोन पातळीवर असतो. एक वैधानिक म्हणजे विधिमंडळ आणि दुसरा संसदीय आणि त्यापलीकडचा मोठा पक्ष रस्त्यावरचा असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आयोगाने सांगितल्यानुसार आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र, सदस्यांचे अर्ज आम्ही सादर केले आहेत . निवडून आलेले खासदार किंवा आमदार म्हणजेच पक्ष हा गद्दार गटाचा दावा हास्यास्पद आहे. सदस्यसंख्येचे गठ्ठे बघून त्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याने ते असे दावे करत आहेत. देशात लोकशाही आहे असे आपण जर मानतो, तर पक्षांतर्गत लोकशाहीसुद्धा आहे. त्यानुसारच आम्ही निवडणुका घेतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

पक्ष जर का बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल किंवा पैशांच्या जोरावर फोडणार असेल तर मग लोकशाहीला काय अर्थ राहतो? निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर केला. तो जर त्यांच्या बाजूने असेल आणि न्यायालयाने जर त्यांना अपात्र ठरवले तर काय करणार? असा सवालही ठाकरे यांनी केला.

शिवसेनेकडे घटना आहे. शिवसेनाप्रमुख पद होते. हे पद फक्त बाळासाहेब ठाकरेंनाच शोभून दिसते, त्यामुळे त्यांच्यानंतर आम्ही हा शब्द गोठवला. मी पक्ष प्रमुख म्हणून कारभार पाहतो आहे. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. गद्दारांनी आम्हाला आधी घटना मान्य नाही सांगितले आणि नंतर घटनेप्रमाणेच काही पदांची निर्मिती केली. विभागप्रमुख हे पद फक्त मुंबईसारख्या मोठ्या शहरांसाठी आहे. त्यांनी मात्र सरसकट विभागप्रमुख नेमल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

सर्वोच्च न्यायालयात १६ जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. घटनातज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा निर्णय आधी लागावा अशी आमची इच्छा आहे. आयोगाने जे काही मागितले ते सगळे आम्ही आयोगाला पुरवले आहे. पण नंतर हे गद्दार गट सांगायला लागले की आमच्याकडे आमदार-खासदार जास्त आहे. एखाद्याला ओसरी राहायला दिली तर तो उद्या घरावर अधिकार सांगायला लागला असा तो प्रकार झाला, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

पक्षाबाबत निवडून आलेल्या प्रतिनिधींवरच ठरवायचे असते तर आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता. त्यानुसार दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या काळात त्यांनी आम्हाला जो खटाटोप करायला लावला, तो आम्ही व्यवस्थित केला आहे. मधल्या काळात आमच्या शपथपत्रांवरही आक्षेप घेतला. मग तो आक्षेप का घेतला? जर तुम्हाला ती मानायचीच नव्हती, तर मग आक्षेप का घेतला? त्यांना आता कळतेय की यांचे पारडे जड आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे, असा आरोप ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.

मुख्यनेतापद घटनाबाह्य

आमच्या घटनेते मुख्यनेता असे पदच नाही. शिवसेनाप्रमुख या पदानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद आम्ही निर्माण केले. मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. ते पद विचारात घेतले जाऊ नये, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. शिवसेनेला घटना आहे, नेता आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात. गेले काही वर्ष पक्षप्रमुख म्हणून मी शिवसेनेचे काम पाहत आहे. यावेळची निवडणूक २३ जानेवारीला होणे अपेक्षित होते. आम्ही निवडणूक आयोगाकडे अध्यक्ष निवडण्याची परवानगी द्या किंवा आहे तसे चालू ठेवा अशी मागणी केली आहे. त्यावर अजून उत्तर आले नाही. आयोग परवानगी देईल तेव्हा निवडणूक होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचे पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पद आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आता त्यांची अडचण ही झाली आहे की, त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : आदित्य ठाकरेंचे काम लोकांना बघवत नाही; अजित पवारांचा विरोधकांना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -