घरमहाराष्ट्रVijay Shivatare : फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारेंचे बंड थंडावले? शुक्रवारी भूमिका स्पष्ट...

Vijay Shivatare : फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारेंचे बंड थंडावले? शुक्रवारी भूमिका स्पष्ट करणार

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात दंड थोपटणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे बंड थंडवल्याचे स्पष्ट संकेत आज झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजित पवार आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई घडवून आणली. शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे शिवतारे शांत झाल्याचे समजते. ते शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (Vijay Shivatare rebellion cooled after Fadnavis intervention The role will be clarified on Friday)

हेही वाचा – Harish Salve : न्याय व्यवस्थेवर विशेष गटाचा दबाव; हरीश साळवेंसह 600 हून अधिक वकिलांचे CJI यांना पत्र

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा पवार निवडणूक लढणार हे निश्चित झाल्यापासून विजय शिवतारे आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका करत बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचार दौरे सुरू केले होते. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे धाबे दणाणले. शिवतारे यांची समजूत घालावी अन्यथा आम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही आमची ताकद दाखवू, असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोनदा बैठक होऊनही शिवतारे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे अजित पवार गटाच्या तोंडचे पाणी पळाले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि विजय शिवतारे उपस्थित होते. या बैठकीत शिवतारे यांनी अजित पवार यांच्याकडून झालेला वारंवार झालेला अन्याय शिंदे, फडणवीस यांच्यासमोर मांडला. अजित पवार यांच्या विरोधामुळे पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आपली कशी कोंडी करण्यात आली, याची व्यथा शिवतारे यांनी बोलून दाखवली. त्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे. बारामतीत राष्ट्रवादीला अडचण झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे मनोधैर्य खच्ची होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जुळवून घ्या तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पूर्ण मदत केली जाईल, असा शब्द शिंदे, फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावतीने शिवतारे यांना देण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – BJP : संजय काकडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; भाजपाश्रेष्ठी बदलणार पुण्याचा उमेदवार?

मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या मनधरणीनंतर शिवतारे यांनी आपली भूमिका सौम्य केल्याचे समजते. आजच्या बैठकीत विजय शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून आपल्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे शिवतारे यांनी सांगितले. यासंदर्भात शुक्रवारी आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे म्हणाले. यावेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले सुद्धा उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -