मी बाळासाहेबांना शब्द दिला म्हणणारे उद्धव ठाकरेच शब्द मोडतात तेव्हा…, संभाजीराजेंचा घणाघात

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो आपण कुठल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथे जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं. जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही पहिलं सांगाल, असं म्हणत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना थेट आवाहनही केलं आहे.

मुंबईः मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला, असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी एकच खळबळ उडवून दिलीय. नेहमीच शब्दाला जागणारे आणि शब्दाचा दाखला देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शब्द आणि वचनं फसवी असतात का?, असा प्रश्न आता भाजपकडून उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे सतत मी शब्द पाळणारे मुख्यमंत्री असल्याचं सांगतात, मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे म्हणून सीएम झालो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शब्द दिला, पण नंतर काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलंय. छत्रपती संभाजीराजेंनी सांगणं मला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणजे उद्धव ठाकरेंचं वचन हे त्या ठिकाणी फसवं असतं हे महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळतंय, असंही भाजप नेते आता उघड उघड बोलू लागलेत.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी शब्द न पाळल्याचे सांगितल्यानंतर आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा चर्चेत आला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यानंतर शिवसेनेने 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागायला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा कोणताही शब्द दिला नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बंद खोलीआड अमित शहा यांच्याशी काय चर्चा झाली होती, याबाबत सविस्तरपणे सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचंही सांगितलं होतं. त्यावरूनच आता अमित शाहांना शब्द न पाळल्याचं सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वतःचे शब्द फसवे असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही शब्द देण्यावरून उद्धव ठाकरेंना सुनावलंय. राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छत्रपती संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरेजींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीनं शब्द पाळला नाही, याचा सविस्तर घटनाक्रमच संभाजीराजेंनी सांगितला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो आपण कुठल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथे जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं. जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही पहिलं सांगाल, असं म्हणत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना थेट आवाहनही केलं आहे.

मी मुंबईत आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले, आमची ओबेरॉयमध्ये मीटिंग झाली. त्या दोघांनी मला सांगितलं की, त्यांची इच्छा आहे, आपण शिवसेनेत प्रवेश करावा. उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करतो. पण मी स्पष्टपणाने सांगितलं मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं, आपण वर्षावर आल्यास आपण चर्चा करू शकतो. लोकशाहीतलं मुख्यमंत्रिपद केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्दे नुसते डिस्कस झाले. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की, छत्रपतींना आम्हाला बाजूला ठेवायचं नाही, ते आमच्या बरोबर पाहिजेत. म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता, आपण शिवसेनेत प्रवेश करा. तर मी स्पष्टपणे सांगितलं अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी, अशी अपेक्षाच असल्याचंही मी त्यांना सांगितलं. तसेच त्या मिनिटालाच शिवसेनेत प्रवेशाचा तो प्रस्ताव मी फेटाळला, असं सांगत त्यांनी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला.

दरम्यान, मीच त्यांना म्हटलं माझ्याकडेही एक प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात, तसा त्यांच्याकडे पूर्ण कोटा नाहीये, तरी त्यांच्यातील महाविकास आघाडीतील अंडरस्टँडिंग आहे. शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धव ठाकरेंनी विचार केला आणि म्हटलं ते राजे शक्य होणार नाही. पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायला आमची तयारी आहे. ही त्यांची वाक्ये आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही दोन दिवस विचार करा, मीसुद्धा दोन दिवस विचार करतोय आणि आपण परत भेटू. दोन दिवसांनंतर त्यांच्या मंत्रिमहोदयांचा मला फोन आला की, मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे. कुठला तरी मध्यम मार्ग काढू, पण आम्हाला तुम्हाला शिवसेना पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. म्हणून मंत्र्यांच्या घरी बैठक सुरू झाली. तिथून मी ओबेरॉयला गेलो. ड्राफ्ट तयार झाला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. तो ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे. सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे. मंत्र्यांच्या अक्षरात हस्तलिखित आहे. त्यांच्याकडून आलेले मेसेजही माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी मी दिलेला शब्द मोडल्याचं सांगत त्यांनी वचन पाळणारे उद्धव ठाकरेच आपल्या शब्दावर ठाम नसल्याचे अधोरेखित केले आहे.


हेही वाचाः मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलताना किरीट सोमय्यांची जीभ घसरली, म्हणाले…