घरमुंबईरेल्वे हद्दीत सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

रेल्वे हद्दीत सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

Subscribe

रेल्वे हद्दीतील सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्याने रेल्वे पोलीस अपयशी ठरल्याचा तारांकित प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला.

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत वर्ष २०१३ पासून ते २०१८ पर्यंत सहा वर्षात सोनसाखळी चोरीच्या २ हजार ८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण ८ कोटी ५६ लाख ७ हजार ४६३ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. मात्र त्यापैकी फक्त २ कोटी ६७ लाख ८३ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. म्हणजेच तब्बल ५ कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल अजूनही मिळालेला नाही. हे प्रमाण जवळपास ६० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीत सोनसाखळी चोरीचे प्रमाण रोखण्यात रेल्वे पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येते.

अमित देशमुखांनी उपस्थित केला प्रश्न

काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली आहे. तसेच या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व रेल्वे स्थानकांवर फलाट गस्त पथक आणि गुन्हे प्रतिबंध तसेच सुरक्षा पथक दिवसरात्र नियुक्त करण्यात आल्याचे लेखी उत्तराद्वारे सांगण्यात आले.

- Advertisement -

गुन्हेगारांवर सीसीटीव्हीची नजर

सोनसाखळी सारख्या गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी जवळपास २७१ सीसीटीव्ही आणि ४०८१ कॅमेरे लावण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांद्वारे १५१२ ही रेल्वे पोलीस हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. रेल्वे कार्यक्षेत्रात आढळून येणारे संशयित, सराईत आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.

हेही वाचा – 

वादग्रस्त ‘डेलॉइट’ प्रकरणी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव; ‘आपलं महानगर’ने केली पोलखोल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -