सदा सरवणकर यांचा शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा; तीन शाखाप्रमुखांनीही सोडले पद

मुंबई : एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असताना बंडखोरांकडूनही राजीनामासत्र सुरू आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह तीन शाखाप्रमुख व अन्य पाच पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे दादरमध्ये संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर दुसरीकडे, राज्यातील शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. आता सदा सरवणकर हे दादर माहिम विधानसभा मतदारसंघातील आमदार असून त्यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखासंघटक यांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – राज्याच्या ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आमच्या मतदार संघातील कामे गेली काही वर्षे अडकली होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण विभागातील कोणतीही विकासाभिमुख कामे मार्गी लागली नाहीत, असे सदा सरवणर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सरवणकर म्हणाले होते की, शिवसेना संपावी अशी कोणाचीही भावना नाही. आम्ही हा उठाव शिवसेना संपवण्यासाठी केला नाही. आमदारांना आपले मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय, आपल्या खात्यातील मंत्र्यांकडून हवा असलेला प्रतिसाद मिळत नव्हता, असे सरवणकर म्हणाले होते.

हेही वाचा – सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस, २१ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश