घरराजकारणशिवसेना फुटीच्या तुकड्यातून नेतेच नव्हे तर, कार्यकर्त्यांच्या कुटुंबात उभ्या राहिल्या भिंती...

शिवसेना फुटीच्या तुकड्यातून नेतेच नव्हे तर, कार्यकर्त्यांच्या कुटुंबात उभ्या राहिल्या भिंती…

Subscribe

मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात काल खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रवेश केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दृष्टीने हा मोठा धक्का होता. शिवसेनेच्या एकूण 19 खासदारांपैकी 13 खासदार आता शिंदे गटात आहेत. विशेष म्हणजे, गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल मात्र ठाकरे गटातच राहणार आहे. शिवसेनेच्या घरातच अशी दुफळी झाल्याची ही पहिलीच घटना नाही. अशा घटना आधीही झाल्या आहेत.

प्रत्येक राजकीय पक्षाला फुटीचा शाप हा लागलेलाच असतो. शिवसेनाही त्याला अपवाद नाही. पक्षातील तेव्हाचे धडाडीचे नेते छगन भुजबळ बाहेर पडले तेव्हा शिवसेनेला पहिला धक्का लागला. त्यानंतर फाटाफुटीच्या अनेक घटना घडल्या. छगन भुजबळांपाठोपाठ राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक या नेत्यांना या ना त्या कारणाने शिवसेना सोडावी लागली. त्यापैकी काही नेत्यांबरोबर अन्य नेते-पदाधिकारीही शिवसेनेतून बाहेर पडले. आता तर, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राहूनच बंड केल्याने शिवसनेते उभी फूट पडली आहे. या फुटीतून ठाकरे, दिघे आणि आता कीर्तिकर या तीन कुटुंबांत भिंती उभ्या राहिल्या आहेत.

- Advertisement -

बीकेसीवर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे, वहिनी स्मिता ठाकरे आणि पुतण्या निहार ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यापैकी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. तर, जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी मात्र आपले काका उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तर, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. उद्धव गटाकडून त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, आनंद दिघेंच्या भगिनी अरुणा गडकरी या शिंदे गटात आहेत. या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तिकर हे आता शिंदे गटात दाखल झाले असून त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे.

याआधीही राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर काही कुटुंबात दुफळी निर्माण झाली होती. त्यात एक प्रमुख नाव होते, मधुकर सरपोतदार. सरपोतदार हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेकडून लोकसभेवर गेलेले मधुकर सरपोतदार हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले तर, त्यांचा मुलगा अतुल सरपोतदार आणि शिल्पा सरपोतदार हे मनसेत गेले होते. तर, अंधेरी येथील माजी आमदार सीताराम दळवी हे कट्टर बाळासाहेब ठाकरे समर्थक तर, त्यांचा धाकटा मुलगा संदीप दळवी यांनी राज ठाकरेंना साथ दिली.

- Advertisement -

एका कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी, शिवसेना ही विभागली गेल्यावर आमची घरे विभागली गेली. माझे वडील, भावंडे, मुले यात दोन गट पडले. त्याचं काय करायचे? आमच्या भांडणाचे काय? गावात भांडण सुरू झाली आहेत. ती थांबायची कशी? असे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले होते. त्यावर, आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून लढलो. लोकांच्या मनातले आम्ही केले, असे उत्तर देऊन मूळ प्रश्नालाच मुख्यमंत्री शिंदे यांनी बगल दिली आहे. केवळ राजकीय कुटुंबच नव्हे तर, सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि मित्रपरिवारातही दुफळी निर्माण झाली आहे, हेच वास्तव आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -