केसरकरांना आवरा, भाजपा नेते राजन तेली यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती

DEEPAK KESARKAR

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर नव्या वादात अडकले आहेत. त्यावरून भाजपातील नेतेही नाराज झाले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांना आवरा, अशी विनंती भाजपा नेते राजन तेली यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

दीपक केसरकर यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेमध्ये झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या ते निशाण्यावर होते. तर, आता त्यांनी नारायण राणेंबद्दल वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विनाकारण राजकीय वातावरण खराब होत आहे. भाजप नेत्यांनी काय बोलावे, काय करावे हे ठरविण्याचे अधिकार दीपक केसरकरांना नाहीत. त्यामुळे त्यांना आवर घालावा, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

काय म्हणाले केसरकर?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला, असा दावा केसरकर यांनी केला आहे.

केसरकरांची सारवासारव
माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणे चुकीचं आहे. एका मु्दद्यावर माझे त्यांच्याशी वाद झाले होते. पण आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. आमची जेव्हा भेट होते, तेव्हा मी आदराने वागतो. जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर त्याचीही तयारी आहे, अशी सारवासारव केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. त्याचबरोबर यापुढे पत्रकार परिषदेत मी राणेंचे नाव घेणार नाही, असेही ते म्हणाले.