बाळासाहेबांची शिवसेना जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार, रामदास कदमांचा निर्धार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून शिवसेना एकसंध राहावी, यासाठी खूप प्रयत्न केले. पण यश आले नाही. यापुढेही हे प्रयत्न सुरूच राहतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे राहू देणार नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. बाळासाहेबांची शिवसेना जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार, अशी भावना माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली.

शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर पक्षातील नेतेपदाला कोणतीही किंमत राहिली नसल्याची खंत व्यकत् करत रामदास कदम यांनी काल या पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

शिवसेना आम्ही उभी केली. ती आता पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळताना पाहवत नाही. त्यामुळे माझी झोप उडाली आहे, मी अस्वस्थ आहे. त्यातूनच मी नेतेपदाचा राजीनामा दिला. पण तोही देताना खूप दु:ख झाले. आजही डोळ्यासमोर बाळासाहेबच आहेत. राजीनामा दिल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन येईल आणि भेटायला बोलावतील, अशी अपेक्षा होती. पण थेट हकालपट्टीच केली. वयाच्या ७०व्या वर्षी, आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून अंधकार होईल असे वाटले नाही, असे ते म्हणाले.

आम्ही पक्ष उभा केला आहे, आमच्या मेहनतीतून तुम्ही त्या खुर्चीत बसला आहात, असे सुनावतानाच, गद्दारी आमच्या रक्तात नाही. मरेपर्यंत मी भगवा सोडणार नाही. पण ही वेळ का आली याचाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचार केला पाहिजे. आज बाळासाहेब असते तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री होऊ दिले असते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या मनालाच विचारावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कधीही पदाचा मोह नव्हता. पण तुम्ही ती विचारसरणी बदललीत. आपला पक्ष वाढवून, आमदारांची संख्या वाढवून मुख्यमंत्रीपदावर बसला असता तर आनंद झाला असता, असेही रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा – रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यात मराठी माणसांचे नुकसान होईल, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडावी, एवढे त्यांचे म्हणणे होते. ते परत यायला तयार होते. पण तेवढ्यात आमच्याच एका नेत्याने सुरुवात केली, कोणाला बैल म्हटले, वेडे म्हटले तर, आमदारांना वेश्याही म्हटले. त्यामुळे ते आमदार चिडले, असे त्यांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले.

आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते!
आदित्य ठाकरे यांना साहेब म्हणावे लागते. माझे वय ७० आहे, तरी म्हणतो. कारण ते ठाकरे आहेत, मातोश्रीमध्ये राहणारे आहेत, अशी खदखद व्यक्त करून रामदास कदम म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी संयम पाळायला पाहिजे होता. त्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी जे आमदार गेले, त्यांनी पक्षासाठी काहीतरी केलेले आहे, हे त्यांनी जाणले पाहिजे होते.
मी पर्यावरणमंत्री असताना ते माझ्या दालनात येऊन बसत असत. काही मिटिंगा बोलवण्यास सांगत असत. नियमांप्रमाणे तसे बोलणे योग्य नसतानाही त्या बोलवत होतो. प्लास्टिकबंदीचा निर्णय मी लागू केला असतानाही त्याचे श्रेय आदित्य ठाकरेंनाच दिले. मला ‘काका, काका’ म्हणणारे आदित्य ठाकरे नंतर माझेच खाते घेऊन बसले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

…तर भीक दिली असे समजू नका
उद्धव ठाकरे सांगत असतात, आम्ही त्यांना ‘हे दिले, ते दिले’; ते योग्य नाही. एखाद्याला मंत्रीपद दिले तर भीक दिली, असे समजू नका. पक्षउभारणीत त्यांचे तसे योगदान आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. ते पक्षकार्य करूनच तिथपर्यंत पोहोचले आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा – वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला धक्का