घरराजकारण'मिंध्यां'पासून महाराष्ट्राला वाचवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा घणाघात

‘मिंध्यां’पासून महाराष्ट्राला वाचवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा घणाघात

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड किंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे, पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात, ”भाजपसोबत आल्याने मी आज समाधानी आहे.” महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत आणि मिंधे-फडणवीस सरकार भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना सभेतील प्रमुख लोक जसे माना खाली घालून बसले होते तसे बसले आहे. रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उद्योग-रोजगार संधींचे अपहरण गुजरातेत केले जात आहे आणि हे अपहरण उघड्या डोळय़ाने पाहणारे मुख्यमंत्री त्यांच्या मिंधे गटासह रामदर्शनासाठी म्हणे अयोध्या नगरीत निघाले आहेत, हा विनोदच म्हणावा लागेल, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लगावला आहे.

- Advertisement -

गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही?
मुंबईचे महत्त्व त्यांना कमी करायचेच आहे, पण आता त्यांची वाकडी नजर महाराष्ट्राकडे गेली आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. गुजरातचा विकास आणि सारा देश भकास अशी नवी घोषणा आता द्यावी लागेल. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ती अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रावर आघात सुरूच
महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प केंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही, तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प ‘किडनॅप’ करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. महाराष्ट्रावर अशाप्रकारे एकामागे एक असे आघात सुरू आहेत, अस या अग्रलेखात नमूद केले आहे.

- Advertisement -

फडणवीसांकडून जनतेची दिशाभूल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. मग तो फॉक्सकॉन प्रकल्प असो किंवा रांजणगाव येथे होणारे ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ असो. तीच गोष्ट बल्क ड्रग पार्क आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रकल्पाची. या प्रकल्पांसाठी म्हणे महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठविले नव्हते! वास्तविक, या प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव आघाडी सरकारने 2021 मध्ये केंद्र सरकारला पाठविले होते. तरीही उपमुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलत आहेत. हे सगळे स्वतःचे अपयश झाकण्याचे ‘उद्योग’ आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

महाविकास आघाडीवर खापर फोडण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले. टाटा यांनी आजपर्यंत त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिले. वेदांता फॉक्सकॉनने तर महाराष्ट्रात पायाभरणी करण्याची सर्व जय्यत तयारी केली होती, पण केसाने गळा कापावा तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडले. महाराष्ट्राला एक उद्योगमंत्री आहेत, ते काय करीत आहेत? तर स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी प्रकल्पांचे अपहरण झाल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडून जबाबदारी झटकत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे.

गुजरातेत तांडव करून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवा
‘मिंधे’ मुख्यमंत्र्याने हिंदुत्व, स्वाभिमान, महाराष्ट्राचे कल्याण वगैरे शब्दांचे बुडबुडे फोडत एक सरकार बनवले ना? मग आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर का फोडता? पुन्हा काय, तर या प्रकल्पांबाबत ‘श्वेतपत्रिका’ काढू, असेही या त्यांनी मंगळवारी जाहीर केले. अशा पत्रिका काढण्यापेक्षा महाराष्ट्रातले प्रकल्प पळवून नेले म्हणून दिल्लीत जाऊन थयथयाट करा. तुमच्या चाळीस खोकेबाज आमदारांचा महाराष्ट्र स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखविण्यासाठी गुजरातेत जाऊन तांडव करा, असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे गटाला दिले आहे.

गुजरातच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रावर हल्ले
महाराष्ट्राच्या हातचे जे उद्योग जात आहेत तो गुंता सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र त्याऐवजी लवकरच मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत, असे मटक्याचे आकडे लावले जात आहेत. हे आधी बंद करा आणि लाखो रोजगार पळवून नेणाऱया मोदी-शहांना खडसावून जाब विचारण्याची हिंमत दाखवा. गुजरातच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे. महाराष्ट्राच्या पोटावर सरळ सरळ लाथ मारण्याचाच हा प्रकार आहे. महाराष्ट्राची लूट करून गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते, अशी बोचरी टीकाही सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

मोदी-शहांचा अट्टहास ‘राष्ट्रीय’ बाण्यास धक्का देणारा
आज जे जे काही नवे घडविले जात आहे, ते सर्व फक्त गुजरातलाच नेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मता व विकासाच्या समतोलास बाधा आणणारे आहे. संरक्षण खात्याचे प्रकल्प असोत किंवा इतर उद्योग, प्रत्येक गुंतवणूक आपल्याच गृहराज्यात नेण्याचा मोदी-शहांचा अट्टहास ‘राष्ट्रीय’ बाण्यास धक्का देणारा आहे. जगातले कोणतेही पाहुणे आले की, त्यांना दिल्लीच्या आधी गुजरातेत नेऊन झोपाळ्यावर झुलवायचे. म्हणजे गुजरात हाच देश, बाकी सर्व कचरा! हे धोरण गुजरातलाही अधोगतीकडे नेणारे व एकमेकांत दरी निर्माण करणारे आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अशा घोर काळी पटते. एका विशाल दृष्टिकोनातून या नेत्यांनी विचार केला म्हणून हे राष्ट्र घडले व टिकले. त्या राष्ट्रास आज सुरुंग लागत आहे, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -