उद्धव ठाकरेंवरील टीकेवर शिंदे गट नाराज; पण भाजपाकडून टीकास्त्र सुरूच

uddhav thackeray

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल भाजपाकडून होणाऱ्या टीकेबद्दल शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यावरील टीकेला आवर घालावा, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. पण दुसरीकडे भाजपाने मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सारले, असे सांगत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी ‘उठाव’ केला. पण आता, उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास तर, आम्ही नक्की जाऊ, असे सांगत बंडखोर आमदारांनी पॅचअपची भूमिका घेतली आहे. अशातच भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांना माफिया म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत सोमय्यांना इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात जाऊन मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याबद्दलचे ट्विट करताना त्यांनी, आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्याबदल अभिनंदन केले, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावरून दीपक केसरकर आणि आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत; ठाणे ते नेरुळदरम्यान वाहतूक ठप्प

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशा प्रकारचे शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोलले तर ते खपवून घेतले जणार नाही, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे. तर, आम्ही शिवसेनेसोबत नाही आणि ते काहीही बोलू शकतील, असा विचार सोमय्या यांनी करू नये. आम्हाला सत्तेची पर्वा नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारे वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही, असे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी म्हटले आहे.

भाजपाची जोरदार टीका
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यामुळेच शिवसेना संपली असून आता शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, अशी टीका पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते व विद्यमान केंद्रीय मत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ज्यांना मुख्यमंत्री असतानाही स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत ते मतदार काय सांभाळणार? असा सवाल करतानाच, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले, हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी दिले.

हेही वाचा – ओबीसी समाजावर घोर अन्याय; नगरपालिका निवडणुकांना राष्ट्रवादीचा विरोध