नेत्यांना मणका असतो, ते उद्धव ठाकरेंकडे पाहून कळाले, नाहीतर… आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

maharashtra shiv sena leader aditya thackeray tweet on Flood affected farmers

महाड : शिवसेनेचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज रायगड येथे पार पडला. आतापर्यंतच्या दौऱ्यात आदित्या ठाकरे यांच्या निशाण्यावर कायम शिंदे गट राहीला आहे. रायगड दौऱ्यात देखील त्यांनी शिंदे गटावर टीका करताना शिवसेना पक्षप्रमख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करताना ‘कणा असलेला राजकीय नेता’ असा उल्लेख केला.

महाड येथे भर पावसात झालेल्या आदित्य ठाकरे बंडखोरांवर तुफान बरसले. महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण आम्ही केले. कोविड काळात उद्धव ठाकरे यांचे कौतुक जगभरात करण्यात आले. कोविड काळात सहा लाख कोटींची गुंतवणूक आपण केली. हा विकास होत असताना कुठेही जातीय दंगली झाल्या नाहीत. प्रत्येक धर्माला सोबत घेऊन जात होतो. हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला नाही. हेच यांच्या पोटात दुखत होते. उद्धव ठाकरे कोणासमोर झुकले नाहीत. राजकीय नेत्यांना मणका असतो, ते उद्धव ठाकरेंकडे पाहून कळाले. नाहीतर दिल्ली दरबारी अनेक जण सध्या झुकत आहेत, असा टोला त्यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

एवढी वर्षं ज्यांना संभाळले, सर्व काही दिले तरी, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आता तुम्ही जिथे गेला आहात, तिथे आनंदी राहा. आमच्या मनात राग-द्वेष नाही. लोकांनी यापूर्वीही अशा उड्या टाकलेल्या आहेत. पण तुमच्यात थोडी तरी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिले.

स्वराज्याच्या राजधानीला लागलेलं गद्दारीचं ग्रहण दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे रायगडात दाखल झाल्याचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी यावेळी सांगितले. त्यावर, आमच्यासोबत राहणार का? अशी भावनिक साद घातल्यावर महाडकरांनी हात वर करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा प्रतिसाद दिला.

राज्यपालांवर टीका
पाच ते सहा राज्यपाल आम्ही पाहिले. अनेक प्रश्न आम्ही त्यांच्याकडे नेले. पण असे राजकीय षडयंत्री राज्यपाल आम्ही पहिल्यांदाच पाहिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, मराठी-अमराठी यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करीत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

अलिबागच्या सभेतही शिंदे गटावर शरसंधान
अलिबागलाही आदित्य ठाकरे यांची सभा झाली त्यातही त्यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले. ‘सरकारमध्ये असताना मंत्रीपद यांना पाहिजे असते. त्यांच्या स्वार्थासाठी आपण सगळे करत गेलो. पण हे नेते हॉटेलमध्ये टेबलावर नाचताना सर्वांनी पाहिले. हे निर्लज्ज आणि गद्दार तुमचे नेते होऊ शकतात का? तुमचे आमदार होऊ शकतात का? तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.