घरनवी मुंबईगारेगार वातावरणात गरमागरम पोपटीची रंगत सुरू

गारेगार वातावरणात गरमागरम पोपटीची रंगत सुरू

Subscribe

खवय्यांना प्रतीक्षा गावठी वालाच्या शेंगांची

वातावरणात गारेगार थंडीचा कडाका जाणवू लागलेला असताना गरमागरम लज्जतदार पोपटी पार्ट्यांची रंगत कोकणात विशेषत: रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झाली आहे. वालाच्या शेंगा, कोनफळ, बटाटे भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये ठेवून विशिष्ट प्रकारे आग तयार करून त्यावर शिजविल्या जातात. त्यामध्ये मांसाहरींसाठी अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. सध्या रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोपटी पार्ट्यांची धमाल सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रुचकर स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर लागणार असल्यामुळे खवय्यांना पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे.

जिल्ह्यात काही भागातील मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्‍या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती आहे. मात्र, पोपटी हंगाम सरून जाऊ नये म्हणून पुण्याहून आलेल्या शेंगांवर समाधान मानावे लागत आहे. विदर्भ, खान्देशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धमाल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी पोपटीचा आस्वाद घेत काव्यसंमेलन रंगतात, तर गप्पा-गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण-घेवाणही होते. पोपटीतून अनेक जणांना चांगले उत्पन्न मिळते.

- Advertisement -

निडीच्या शेंगांची चलती..
पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत आणि चव टिकून राहते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव आणि टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. निडी परिसरातील जमिनीचा पोत कसदार असून, परंपरागत पद्धतीने जपवूणक करून ठेवलेले बियाण्याचाच वापर येथे केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ट गोड चव, शेंगेचा आणि दाण्याचा आकारही मोठा. सुरुवातीस बांधावर आलेल्या शेंगाची चव तर अधिकच रुचकर. या शेंगांचा वाल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र यंदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे अजूनही या शेंगा तयार होण्यास उशीर होईल.

शेतकर्‍यांच्या हाती चार पैसे..
खास करून पोपटी करण्यासाठी गावठी वालाच्या शेंगांना मागणी असते. जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडेपंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास ४ हजार ३८१ हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. वालाला सुरुवातीस दर चांगला मिळतो. किलोला १०० ते १२० रुपये. नंतर शेंगा सर्वत्र येऊ लागल्या की शेवटी दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत जातो. लागवड आणि मशागत करण्यासाठी मेहनत लागते. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवून त्यापासून मिळालेल्या वालाची विक्री देखील केली जाते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे वालाचे उत्पादन मिळण्यास उशीर लागणार असल्याचे नीलेश शिर्के या शेतकर्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -