घरमहाराष्ट्रप्रवीण परदेशींना यायचंय महाराष्ट्र'देशी'; शिंदे-फडणवीसांच्या निकटवर्तीयांकडून लॉबिंग सुरू

प्रवीण परदेशींना यायचंय महाराष्ट्र’देशी’; शिंदे-फडणवीसांच्या निकटवर्तीयांकडून लॉबिंग सुरू

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना नव्या शिंदे सरकारकडून नवी जबाबदारी सोपविली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या एका समितीवर परदेशी कार्यरत असले तरी, त्यांचे पूर्ण लक्ष महाराष्ट्रात आहे. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात योजलेल्या एका बैठकीतील त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधत होती. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासकीय सल्लागार म्हणून कार्यरत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील फुटीरगटाने भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आधीच्या महाविकास आघाडी सरकारने बाजूला केलेले सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबादारी दिली जाईल. कुठेही सत्ताबदल झाल्यानंतर हेच चित्र पाहायला मिळते. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची पदे दिली जातात. त्यामुळे प्रवीण परदेशी यांचेही पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. तसे प्रयत्नही त्यांच्याकडून सुरू असल्याचे समजते

- Advertisement -

महाराष्ट्रात परदेशी पुन्हा सक्रिय
सत्तेवर येताच ठाकरे सरकारने परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून मे 2020मध्ये हटविले होते. त्यांनी 2019मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर प्रवीण परदेशी विविध केंद्रीय समित्यांमध्ये सक्रिय होते आणि नोव्हेंबर 2021मध्ये निवृत्त झाले. पण आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर प्रवीण परदेशी पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र, भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा 50वा वाढदिवस अलीकडेच मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यावेळ परदेशी यांच्या उपस्थितीची नोंद सर्वानीच घेतली.

फडणवीसांच्या कार्यकाळात अतिरिक्त मुख्य सचिव असलेले प्रवीण परदेशी यांनी, गुवाहाटीवरून गोव्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. त्यापाठोपाठ काल, गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते. तथापि, मी केवळ कृषी आणि नैसर्गिक आपत्तीविषयक दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात मुंबईत आलो असल्याचे प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

परत सीएमओत येण्यासाठी परदेशींची जोरदार लॉबिंग
पुन्हा सीएमओत येण्यासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांच्या एका अत्यंत निकटवर्तीयाला परदेशी भेटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करून मला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी त्याला सांगितल्याचे समजते. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्तीयाची देखील कालच त्यांनी मुंबईत भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय सल्लागारपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून माजी मुख्य सचिव अजोय मेहता आणि सीताराम कुंटे यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे, त्यामुळेच येनकेन प्रकारे पुन्हा सीएमओत येऊन सत्ताकेंद्रस्थानी सक्रिय होण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

ज्यांच्याबरोबर काम केले त्याच मुख्यमंत्र्यांना फटका
मात्र, परदेशी हे ज्यांच्यासोबत सीएमओत काम करतात, ते पुन्हा सत्तेत येत नाहीत, अशी एक चर्चा सनदी अधिकाऱ्यांमध्ये आहे. 1999-2003 या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे ते सहसचिव होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जॉनी जोसेफ होते. मात्र जोसेफ यांच्यापेक्षा परदेशी यांचाच दबदबा जाणवत होता.

तसेच 2014-2019 या काळात प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव होते. फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. मात्र 2019 साली जुलै ते ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी संपूर्ण यंत्रणा विभागीय आयुक्तांऐवजी सीएमओतून परदेशी हाताळत होते. त्याचा फटका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसला आणि भाजपाने या जिल्ह्यांतील 9 जागा गमावल्या. त्याचवेळी साताऱ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भिजून एकहाती सत्ता फिरवत राष्ट्रवादीचे 53 आमदार निवडून आणले होते.

कोण आहेत प्रवीण परदेशी?
सन 1985च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रवीण परदेशी यांनी महायुती सरकार काळात मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसेच महसूल या महत्त्वांच्या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिले आहे. 2019-2020 या काळात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते अतिरिक्त मुख्य सचिव होते. 30 वर्षांहून जास्त कार्यकाळात लातूर तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. 1993मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळी परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी परदेशी यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवलेल्या धाडसाचे खास कौतुक करण्यात आले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -