घरमहाराष्ट्रराजकीय सत्तानाट्यात अजितदादांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन; म्हणाले...

राजकीय सत्तानाट्यात अजितदादांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन; म्हणाले…

Subscribe

उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ हे रामटेकवर वास्तव्य करत असत. तर आर आर पाटील हे चित्रकूटवर उपमुख्यमंत्री असताना वास्तव्यास होते.

मुंबई : खरी शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मात्र वेगळीच काळजी लागली असल्याचे समजते. त्याच काळजीतून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि एक विनंती केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपलं महानगरला मिळाली आहे.

साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आणि त्यापूर्वी दीड दिवसाचे उपमुख्यमंत्रिपद मिळवण्याचा विक्रम अजित पवार यांनी केला होता. उपमुख्यमंत्रिपदाच्या या काळात अजितदादांनी देवगिरी बंगल्यावर मुक्काम केला. मलबार हिलस्थित हा बंगला अजित पवार यांचा सर्वात आवडता बंगला आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी काँग्रेसबरोबर आघाडी करत सत्ता स्थापन करण्यात आली होती आणि जलसंधारणमंत्री (कृष्णाखोरे विकास) असताना अजित पवार यांना हा बंगला मिळाला होता. उपमुख्यमंत्री असूनही दादांना देवगिरीनं आपलंसं केलं होतं. यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ हे रामटेकवर वास्तव्य करत असत. तर आर आर पाटील हे चित्रकूटवर उपमुख्यमंत्री असताना वास्तव्यास होते. 1999 ते 2014 अशी मिळून 15 हून अधिक वर्षे देवगिरी बंगला हा अजितदादांकडेच होता. त्यामुळे अजितदादांचे त्या बंगल्याशी वेगळेच ऋणानुबंध आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यानंतर देवगिरी बंगला भव्य समजला जातो. जेव्हा 2014 मध्ये भाजपा-शिवसेनेचे सरकार आले, तेव्हा अजित पवारांना हा बंगला सोडावा लागला होता. पण नंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकराच्या काळात हा बंगला पुन्हा एकदा अजित पवारांना मिळाला. अडीच वर्षांतच सरकार गडगडल्याने त्यांना हा बंगला आता सोडावा लागणार आहे. हा बंगला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. त्यामुळे अजितदादांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि देवगिरी हा बंगला आपल्याकडेच ठेवू देण्याची विनंती केली. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास होकारही दिला नाही की नकारही दिला नाही. त्यामुळे हा बंगला नक्की कोणाकडे राहील, हे लवकरच स्पष्ट होईल.

मात्र असे असले तरी विरोधी पक्षनेते बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला मला न विचारता कसा काय दिला, असा सवाल अजितदादा यांनी अडीच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्याची आठवण फडणवीस यांचे निकटवर्तीय करतात. देवगिरीच्या तुलनेत सागर बंगला हा छोटा असून, उपमुख्यमंत्री असल्याने फडणवीस यांच्याकडे दादासारखाच बैठका आणि भेटणाऱ्यांचा राबता असणार आहे. त्यामुळे दादा यांनी मोठे मन दाखवत देवगिरी बंगला लगेच रिकामा करून आदर्श निर्माण करायला हवा. तसेच देवगिरीवर किमान 20 गाड्या पार्क करण्याची सोय असून, सागरवर जाताना ट्रॅफिक जाम होते याकडे फडणवीस समर्थक लक्ष वेधतात. त्यामुळे फडणवीस अजितदादा यांची मैत्री जपतात की सागर बंगला रिकामा करून देवगिरीवर राहायला जातात, यासाठी पुढील काही दिवस वाट बघावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचाः उद्धव ठाकरेंना पवारसाहेब लाडके, शिवसैनिक परके; दीपक केसरकरांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -