घरताज्या घडामोडीसहानुभूतीसाठी उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, दीपक केसरकरांची टीका

सहानुभूतीसाठी उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, दीपक केसरकरांची टीका

Subscribe

आम्हाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आता शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा तसेच पक्षाचा निधी ताब्यात घेणार असल्याची चर्चा खोटी आहे. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी अशा युक्त्या लढवल्या जात आहेत. जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली पक्षाची घटना बदलून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते, उपनेते आणि शिवसैनिकांचे अधिकार आपल्या हातात घेतले, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले. त्यामुळे शिंदे गटाकडून शिवसेना भवन, राज्यभरातील पक्षाच्या शाखा आणि पक्षाचा निधी ताब्यात घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही चर्चा निराधार असल्याचे केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आम्हाला शिवसेना भवन किंवा कोणताही निधी नको. आम्ही बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन पुढे जाणार आहोत. शिवसैनिक वडापाव खाऊन काम करतात. त्यांच्या वर्गणीतून जमा झालेले त्यांचे हक्काचे पैसे तुम्ही वळवणार असाल तर तशी काम करण्याची आमची पद्धत नाही, असा टोला केसरकर यांनी ठाकरे यांना लगावला.

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचा समाचार घेताना केसरकर यांनी राऊत यांच्यावर शिवसेना संपविण्याची सुपारी घेतल्याचा प्रत्यारोप केला. ही सुपारी पूर्ण झाली नाही म्हणून राऊत असे बोलत आहेत. राऊत हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ नाहीत. राऊत हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ होते. पण आता ते शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत आणि स्वतः राऊत यांनी हे अनेकदा सांगितले आहे, असे केसरकर म्हणाले.

संजय राऊत यांनी निवडणूक चिन्ह आणि पक्षनावाच्या निर्णयावर दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल विचारले असता, संजय राऊत हे सध्या काही अटींच्या अधीन राहून जामिनावर बाहेर आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. त्यामुळे याप्रकरणी निवडणूक आयोग, ईडी. पोलीस यांच्यात तक्रार करून संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : कोश्यारींचा दावा योग्य, ठाकरेंच्या इगोमुळे पत्राचा फॉरमॅट..; देवेंद्र फडणवीसांची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -