घरसंपादकीयअग्रलेखमुस्कटदाबी अशीही तशीही

मुस्कटदाबी अशीही तशीही

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा पुढील 2 ते 3 आठवड्यात कधीही होईल, अशी चिन्हे आहेत. लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी जागावाटपाचे अडलेले घोडे पुढे दामटवण्याचे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पारच्या पलीकडे घेऊन जाण्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांची भूमिका मोलाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचा उधळता वारू रोखण्यातही महाराष्ट्रच दिशादर्शक असेल, असा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात स्वबळाचा हट्ट न धरता दोन्ही बाजूंचा युती-आघाडीवरच प्रामुख्याने भर आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच विदर्भाच्या दौर्‍यावर येऊन गेले. या धावत्या दौर्‍यात अमित शहांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेत पदाधिकार्‍यांना लोकसभेसाठी कानमंत्र दिला. त्यापाठोपाठ उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान गाठत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते. तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर अमित शहा यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्यासोबत स्वतंत्र बैठका झाल्या. तसेच मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शहा यांच्यात सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीसाठी अमित शहा दिल्लीतूनच जागावाटपाचा फॉर्म्युला खिशात घेऊन आल्याचे म्हटले जात होते. कारण ही बैठक संपताच महायुतीच्या फॉर्म्युल्याचे एक ना अनेक आकडे समोर येऊ लागले. भाजप महाराष्ट्रात 32 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम 3 ते 4 जागाच मिळू शकतात, असा अंदाज आहे. राष्ट्रवादीची लोकसभेतील घटलेली पॉवर बघता अजितदादा गटाला ज्या काही जागा मिळतील, त्यावर त्यांनी समाधान मानून घेतलेलेच बरे, परंतु या जागावाटपात खरी मुस्कटदाबी सुरू आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची.

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीत निवडणूक लढवताना शिवसनेने राज्यात 23 जागा लढवत 18 जागा जिंकल्या होत्या. या 18 जागांपैकी शिंदे गटाकडे 13 आमदार आणि ठाकरे गटाकडे 5 आमदार आहेत. या 18 पैकी 18 जागांवर शिवसेना निवडणूक लढवेल, असा दावा काही दिवसांपूर्वीपर्यंत शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात होता, परंतु भाजपच्या आक्रमक रणनीतीपुढे हा आवाज क्षीण झाला आहे. आजघडीला शिंदे गटाच्या ताब्यातील जागा तर सोडाच, परंतु शिवसेनेला 10 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे दिसत आहे.

एकनाथ शिंदे-अजितदादा पवार गटातील काही उमेदवारांना कमळ चिन्हावरदेखील निवडणूक लढवावी लागू शकते, असा प्लॅन बी शिजतो आहे. तसे झाल्यास शिंदे गटाकडील जागा सिंगल डिजिट अर्थात एक आकड्यांवर घसरण्याचा कयास आहे. एकनाथ शिंदे गटासह अजितदादा गट लवकरच जागावाटपाच्या शेवटच्या वाटाघाटींसाठी दिल्लीवारी करतील अशा चर्चा आहेत, परंतु अमित शहांनी जागावाटपाचे फासे आधीच टाकल्याने या दिल्लीवारीतून फार काही हाताला लागेल, असे वाटत नाही. महाराष्ट्रात 48 पैकी 48 जागांवर ताकद असूनही शिंदे गटासह अजितदादा गटाला वार्‍यावर सोडता न येणे ही भाजपची अपरिहार्यता आहे, त्यातूनच जास्तीत जास्त जागा ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पटले तर घ्या नाही तर जा, अशी फरपट होण्याआधी या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज आहे.

- Advertisement -

दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील जागावाटपाच्या वाटाघाटींनीदेखील वेग घेतला आहे. आतापर्यंत मविआतील प्रमुख नेत्यांच्या ज्या काही बैठका झाल्या, त्यात मविआच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरदेखील चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार 48 जागांपैकी ठाकरे गट 20, काँग्रेस 20 आणि शरद पवार गट 8 जागा वाटून घेतील, त्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस आपल्या कोट्यातील प्रत्येकी 3 जागा वंचितला आणि शरद पवार गट आपल्या कोट्यातील 2 जागा मित्रपक्षांना सोडतील, असा हा फॉर्म्युला आहे, परंतु या फॉर्म्युल्यावर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर फारसे खूश असल्याचे दिसत नाही. भाजपविरोधात ठामपणे लढण्याचा निर्धार केल्याचे सांगायचे आणि वेगवेगळ्या अटी घालून आघाडीला कोंडीत पकडायचे धोरण वंचितने अवलंबले आहे.

लोकसभेच्या ४८ पैकी १५ उमेदवार इतर मागासवर्ग समाजाचे, तर 3 अल्पसंख्याक समाजाचे द्यावेत, लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीतील कोणत्याही पक्षाने भाजपसोबत जाऊ नये याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशा अटी आंबेडकर यांनी ठेवल्या आहेत. या अटींमुळे धरले तर चावते, सोडले तर पळते अशी अवस्था मविआतील नेत्यांची झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली, मात्र आंबेडकर 2 तासानंतर बैठकीतून बाहेर पडले. आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळे काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडला पाहिजे, मात्र समोरच्याची मुस्कटदाबीच करायची असा जर कुणाचा उद्देश असेल, तर युती असो वा आघाडी फाटाफूट व्हायला वेळ लागणार नाही. या मुस्कटदाबी वा फाटाफुटीचे खरे चित्र निवडणुका लागताच महाराष्ट्रापुढे आल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -