घरसंपादकीयओपेडअजितदादा सांभाळून... पवार संपवण्याचा डाव!

अजितदादा सांभाळून… पवार संपवण्याचा डाव!

Subscribe

बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांना देण्यात आला आहे. येथून त्यांना महायुतीचेच साथीदार शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारेंचे कडवे आव्हान उभे राहत आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे पवार विरुद्ध पवार सामना फक्त बारामतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. लोकसभेनंतर विधानसभेत तर ही धार आणखी तीव्र असणार आहे. अजित पवारांविरुद्ध त्यांचे वडील बंधूही समोर आले. त्यांनी व्यक्त केलेली चिंता अजितदादांनी वेळीच लक्षात घेण्यासारखी आहे. संघाला पवारांना संपवायचे आहे. म्हणजेच पवारांचे राजकारण महाराष्ट्रातून संपवायचे आहे. त्यासाठी अजित पवार हा मोहरा भाजपच्या गळाला लागला. आधी शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, अशी भाषा आता स्वतः देवेंद्र फडणवीस करत आहेत.

महाराष्ट्रात भाजपला वाढण्याची संधी विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोड्या प्रमाणात मिळाली, मात्र पश्चिम महाराष्ट्रात अजूनही तसा शिरकाव करता आलेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष फोडायचा. यामुळे या पक्षाचं जे सर्वात मोठं असेट, सहकार क्षेत्रावर ताबा मिळवायचा आणि नंतर अजित पवारांनाही मांडलिक बनवून त्यांचे राजकारण संपवायचे हा भाजप, संघाचा डाव अजितदादांनी ओळखला पाहिजे. शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकारण भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात मोठे अडचणीचे ठरणारे आहे.

येत्या काळात फडणवीसांना आव्हान देऊ शकेल असे राज्यात बोटावर मोजता येतील एवढेच नेते आहेत, त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते म्हणजे अजित पवार यांचे. तेव्हा त्यांनाच मांडलिक करून सोबत ठेवल्यास राज्यात विरोधकच राहणार नाही. हा लाँग टर्म राजकारणाचा विचार भाजप आणि संघांच्या धुरीणांनी केलेला आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीस, भाजप आणि संघाने राष्ट्रवादीविरोधात फासे टाकले आहेत. या चक्रव्यूहातून अजितदादा बाहेर निघणार की अडकत जाणार हेही लोकसभा निवडणूक ठरवणार आहे. तेव्हा त्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे.

- Advertisement -

पवार कुटुंबाचे राजकारण हे बारामतीवर आधारित आहे. बारामतीमध्ये गेल्या पाच दशकांपासून ते विधानसभा किंवा लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. शरद पवार हे जेव्हा विकासाबद्दल बोलतात, तेव्हा ते बारामतीचे मॉडेल महाराष्ट्रासमोर ठेवतात. त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये हरवले, तर पवार कुटुंबांच्या राजकारणावरच घाला घालता येतो आणि त्याचे थेट परिणाम त्यांच्या राज्यातील राजकारणावर पडतात हे भाजप ओळखून आहे.

त्यामुळे पवारांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम भाजपने कित्येक वर्षांपासून सुरू ठेवले आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकारणदेखील पवार विरोधावरच तग धरून होते. महाराष्ट्रात भाजप खर्‍या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवणारे गोपीनाथ मुंडे होते. महाजन-मुंडे या जोडगोळीने भाजपचा विस्तार प्रस्तापित आणि विस्थापित या दोहोंमध्ये केला.

- Advertisement -

८०च्या दशकात भाजप, संघ आणि वसंतराव भागवतांनी राज्यात ‘माधव’ फॉर्म्युला आणला. ‘माधव’ म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी. या फॉर्म्युल्याचा जनाधार निर्माण करण्यासाठी वापर आणि दुसरीकडे राजकीय पातळीवर पवार विरोध, अशा पद्धतीचे राजकारण भाजपच्या मुंडे-महाजनांनी केले. तेव्हा त्यांना पांडुरंग फुंडकर, महादेव शिवणकरांची साथ लाभली. यातून १९९५ ला युतीचे सरकार राज्यात आले, पण पवारांचे राजकारण संपवण्याचे ध्येय हे नेते गाठू शकले नाही, ते अपूर्णच राहिले.

पश्चिम महाराष्ट्रात मोठी लोकसंख्या असलेला धनगर समाज पवारांच्या पाठीशी उभा राहिला. त्याला तोडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या विरोधात धनगर समाजाचे महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे नेते गेल्या दशकात मैदानात आणले. जानकर हे उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांच्या भाषेची पातळी आणि विरोधाची धार ही तात्विक राहिली, मात्र गोपीचंद पडळकरांनी चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या शरद पवारांवर अतिशय शेलक्या भाषेत बोलायला सुरुवात केली.

यात त्यांनी संपूर्ण पवार कुटुंबालाच वेळोवेळी धुवून काढले. धनगर समाजाची फसवणूक करूनच पवारांचे राजकारण बारामतीत सुरू असल्याचा आरोप पडळकरांनी केला. अजित पवारांवरही त्यांनी वारंवार शाब्दिक हल्ले केले. पडळकरांच्या टीकेला शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. आता अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर पडळकरांची तलवारही म्यान झाल्यासारखी झाली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा काळ संपला असे वक्तव्य मागील निवडणुकीत केले होते, मात्र त्यानंतर पवारांनी सातार्‍यातून श्रीनिवास पाटलांना खासदार म्हणून निवडून आणले आणि २०१९ मध्ये पुन्हा राज्यात सत्ताही स्थापन करून दाखवली. यामुळे शरद पवार काही संपत नाहीत, हे फडणवीसांना कळून चुकले. आता भाजप नेत्यांनी शरद पवारांचे राजकारण संपवण्याची भाषा सुरू केली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका सभेत शरद पवारांचा पराभव करणे एवढे एकच आमचे ध्येय असल्याचे म्हटले. आम्हाला पवारांना पराभूत करायचे आहे, ती संधी गमावणार नाही, असे पाटील म्हणाले. यावरून भाजपला राज्यातून पवारांच्या पराभवाची किती घाई झाली आहे आणि आता तो दृष्टिक्षेपात दिसत असल्याचा आनंद त्यांच्या वक्तव्यातून जाणवत आहे.

भाजपने गेल्या दहा वर्षांपासून बारामतीमधून पवारांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने २०२२ मध्ये सुरू केली. त्यांनी देशातील १४४ मतदारसंघ निवडले जिथे भाजप कधीही जिंकलेली नाही. त्यात राज्यातील १६ मतदारसंघाची निवड झाली. बारामती मतदारसंघ त्यात वरच्या क्रमांकावर आहे. अमेठीमध्ये ज्या पद्धतीने भाजपने काँग्रेसला आव्हान दिले तीच रणनीती बारामतीमध्ये आखण्यात आली. मोदींनी सुरुवातीला काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा दिली.

यासाठी त्यांनी सर्वात पहिले राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान दिले. गांधींना उत्तर प्रदेशातून, उत्तर भारतातून संपवण्यासाठी त्यांचे होम ग्राऊंड, अमेठीतून पराभूत करण्याचे ठरवण्यात आले आणि केले गेले. त्यासाठी आधी राहुल गांधींना बदनाम करण्यात आले. त्यांना पप्पू ठरवण्यात आले. यानंतरचे भाजप, संघाचे टार्गेट बारामती आहे. ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती संपवायचे हे भाजप आणि संघाचे नेते खासगीत बोलतात.

आता चंद्रकांत पाटील आणि राम शिंदेंसारखे नेते उघडउघड बोलायला लागले आहेत. बारामतीत शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात राहुल गांधींविरुद्ध केला तसा प्रचार भाजपला करता येत नाही. तेव्हा संसदरत्न असलेल्या सुप्रिया सुळेंविरोधात नरेटिव्ह सेट केले जात आहे की संसदेत भाषण देऊन ग्राऊंडवर कामे होत नाहीत आणि हे अजित पवारच म्हणत आहेत, पण अशा वक्तव्यांमधून आपल्याच हातून आपण आपलीच लोकांच्या मनातील सहानुभूती संपवत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

भाजपने जेव्हा मिशन १४४ ची घोषणा केली, तेव्हा रोहित पवारांचे विधानसभेतील विरोधक राम शिंदे यांना भाजपने बारामती मतदारसंघाचे प्रभारी केले. कर्जत जामखेडमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतले गेले. शिंदेंनी २०२२ मध्ये म्हटले होते की जे अमेठीचे झाले तेच बारामतीमध्ये होणार. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे बारामतीत २०२२ पासून वाढले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दौरे सुरू केले होते. त्या बारामतीमध्ये निवडणूक लढणार नव्हत्या, पण त्यांच्या दौर्‍यामुळे पुणे, बारामतीमध्ये भाजपची वातावरण निर्मिती सुरू झाली होती. ती फक्त एका निवडणुकीसाठी नव्हती, तर पवारांचा ऐरा संपवण्यासाठीची पायाभरणी होती, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

भाजपने सुप्रिया सुळेंविरोधात बोलण्यासाठी त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांची नियुक्ती केली. सुप्रिया सुळेंनी ट्वीट केले किंवा कुठे भाजप, फडणवीसांविरोधात भाषण केले, साधे वक्तव्य केले की त्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चित्रा वाघ सज्ज असतात. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर काही तासांतच चित्रा वाघ यांचा व्हिडीओ किंवा ट्वीट समोर येते. त्यातून सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केलेला असतो. अमेठीमध्ये स्मृती इराणी सक्रिय झाल्यानंतर त्यांनी याच पद्धतीने राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली होती.

आता या पंक्तीमध्ये राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या रुपाली चाकणकरही जाऊन बसल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना एका लोकप्रतिनिधी महिलेवर चाकणकरांकडून होणारी टीका ही संसदीय राजकारणाची पातळी कुठे नेऊन ठेवली आहे, असा प्रश्न पडावा, अशी आहे. त्यामुळे ही भाजप आयटी सेलकडून आलेली स्क्रिप्ट असते की भाजप, संघाकडून ठरवून चालवलेला अजेंडा हे अजित पवारांनी ओळखले पाहिजे.

अजित पवारांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवारांनीच म्हटले आहे की, भाजप आणि संघाला कित्येक वर्षांपासून पवारांचे राजकारण संपवायचे आहे, पण त्यात यश येत नाही. यासाठी आता त्यांनी घरातीलच माणूस फोडला आहे. अजित पवारांना आता ठरवायचे आहे की तात्पुरत्या लाभासाठी भाजपचे मांडलिकत्व पत्करायचे की स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी भाजपच्या पिंजर्‍यातून बाहेर पडायचे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -