पप्पा एकदम ठणठणीत, धर्मेंद्र यांच्या तब्येतीच्या अफवांवर बॉबी देओलचं स्पष्टीकरण

धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अफवा पसरली होती

dharmendra rumors

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Bollywood Actor Dharmendra) यांची तब्येत खालावली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचंही सांगण्यात येतंय. मात्र, या प्रकरणावर धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल (Actor Boby Deol) याने प्रतिक्रिया दिली आहे. माझे वडिल एकदम व्यवस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. (Bobby Deol’s explanation on rumors about Dharmendra’s health)

धर्मेंद्र यांना मे महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्यायाम करताना त्यांच्या पाठीत दुखू लागल्याने त्यांना दाखल केलं होतं. आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र, आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली. दरम्यान, धर्मेंद्र यांची तब्येत एकदम व्यवस्थित असल्याची माहिती बॉबी देओलने दिली आहे.

हेही वाचा – व्यायाम करताना झाला होता त्रास; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बॉबी देओलने हा खुलासा केला आहे. पसरणाऱ्या अफवांबाबत बॉबी देओलने म्हटलं आहे की, माझे वडिल एकदम ठिक आहेत. आपल्या वडिलांबाबत दाखवलेल्या प्रेमासाठी त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले आहेत. बॉबीने प्रतिक्रिया दिल्यानंतर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

धरम सिंग देओल हे त्यांचं खरं नाव आहे. त्यांचं बालपण साहनेवाल या गावात गेलं. सहा दशकांच्या कारकिर्दित त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. १९६० मध्ये त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांना फूल और पत्थर या चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी मिळाली.

वाचा – कौन से चक्की का आटा खाते हो ? धर्मेंद्रजींना बादशाहचा सवाल, उत्तर मिळालं…

जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rockey Aur Rani ki Prem Kahani) हा त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रिकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. पुढच्या वर्षी १० फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय.