घरफिचर्समायमहानगर ब्लॉग'हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव म्हणा'

‘हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव म्हणा’

Subscribe

आज ८ एप्रिल, चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमान जन्मदिवस म्हणून साजरा होतोय. सध्या ज्या पध्दतीने कोरोना विषाणूचा प्रकोप पसरला आहे, तो प्राचीन काळातील राक्षसाप्रमाणे उच्छाद मांडत आहे. आपण सर्व जाणतो की महावीर हनुमानाने अनेक राक्षसांचा संहार केला आणि आजच्या काळातील कोरोनारुपी राक्षसाचा वध करण्यासाठी पुन्हा एकदा महावीर हनुमानाची गरज आहे. यानिमित्ताने आपण प्रार्थना करुया की महावीर हनुमान कोरोनारुपी राक्षसाचा संहार करून लवकरच कोरोनापासून मुक्ती देतील. पण त्यापूर्वी हनुमान जयंती जन्मोत्सवाबद्दलची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण आपल्याकडे सर्वत्र हनुमान जयंती असा उल्लेख केला जातो.  हनुमान चिरंजीव असल्याने जयंती म्हणणे योग्य नाही. तर हनुमान जन्मोत्सव असा उल्लेख करणे का गरजेचे आहे? त्यासाठी हा लेख प्रपंच…

संपुर्ण हिंदुस्थानात श्री हनुमानाचा जन्मदिवस जल्लोशात व मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. परंतु बहुतेक लोक या दिवसाचा उल्लेख हनुमान जयंती असा करतात. पण भाविकांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की, जयंती अशा व्यक्तींची केली जाते ज्यांचे निधन झाले आहे. मात्र हनुमान तर चिरंजीवी आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाचा जयंती असा उल्लेख करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हनुमान चिरंजीवी आहेत, याची माहिती फार कमी लोकांना आहे. पण हनुमान कसे चिरंजीवी झाले, हे त्याहूनही कमी लोकांना माहिती आहे. त्यासाठी रामायणाच्या किष्किंन्धा कांडमध्ये डोकावून पहावे लागेल. हनुमान जेव्हा बालक स्वरुपात होते, तेव्हा सूर्याला फळ समजून ते गिळंकृत करण्यासाठी आकाशात झेपावले. पण जर हनुमानाने सूर्याला गिंळकृत केले तर संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल, या जाणीवेने भयभीत होऊन देवांचा राजा इंद्राने हनुमानावर वज्रास्त्राने प्रहार केला. या वज्रास्त्राची तुलना आजच्या काळातील न्युक्लिअर मिसाईलशी केली तर याच्या आघाताने कोणाचाही विनाश होईल. पण वज्रास्त्राच्या प्रहाराने हनुमानाच्या जबड्यावर जखम झाली व काही क्षणासाठी हनुमान मुर्छित झाले.

- Advertisement -

इंद्राने वज्रास्त्र सोडल्याने हनुमानांचे पिता वायुदेव हे संतप्त झाले आणि पृथ्वीवरून विरक्त होण्याची घोषणा केली. पण पृथ्वीवरून वायू नाहीसा झाला तर पृथ्वीतलाचे संपूर्ण जीवनच संपुष्टात येईल. या विचाराने विचलित होऊन इंद्रदेव हे वायुदेवाची समजूत काढण्यासाठी प्रकट झाले. हनुमानाला झालेल्या जबड्याच्या जखमेवरून त्यांनी हनु (जबडा) व मान(विलक्षण) असे नाव दिले. तसेच असे वरदान दिले की माझ्या वज्राच्या प्रहाराने ज्याचा अंत होऊ शकला नाही त्याला कोणतेही अस्त्र-शस्त्र मारु शकणार नाही. यावेळी वायूदेवाचा क्रोध शांत करण्यासाठी स्वतः ब्रह्मा-विष्णू-महेश प्रकट झाले आणि ब्रह्माचे ब्रह्मास्र्त्र, विष्णूचे सूदर्शनचक्र, शिवाचे त्रिशुळ या अस्र्त्रांचाही हनुमानावर कोणताही परिणाम होणार नाही असे वरदान दिले. अशाच प्रकारे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये देखील भगवान श्रीराम यांनी स्वतः हनुमानाला चिरंजीवी होण्याचे वरदान दिल्याचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे या कथांचा आधार घेतला तर ही गोष्ट स्पष्ट आहे की हनुमान हे चिरंजीव आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाला जयंती असे संबोधणे म्हणजे शास्त्राला खोट्यात पाडण्यासारखे आहे. शेवटी हनुमान भक्तांना माझी अशी विनंती आहे की, हनुमानाच्या जन्मदिवसाला हनुमान जन्मोत्सव म्हणणे अधिक परिपूर्ण व योग्य होईल.

तेल पायावर का अर्पण करावे

यंदाच्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्तांनी आखणीन एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तेल हनुमानाच्या डोक्यावर न ओतता, हनुमानाच्या पायावरच ओतावे. त्या मागेही एक कथा आहे. एकदा हनुमान एका गुंफेत रामनामाचा जप करीत असताना शनीदेव आले आणि हनुमानाला सांगितले की, पुढील साडे सात वर्षे तुम्हाला शनीचा काळ सुरु होईल त्यावर रामाच्या भक्तांवर त्याचा परिणाम होणार नाही असे उत्तर हनुमानाने दिले. या उत्तरावर शनीदेव संतप्त झाले त्यांनी हनुमानाला युध्दाचे आव्हान दिले. हनुमानाने शनीदेवांना एक फटक्यात खाली पाडले. अशा प्रकारे सात वेळा हनुमानाने शनीदेवांचा पराभव केला. आठव्यांदा शनीदेवांनी युध्दाचे आव्हान दिले तेव्हा हनुमानाने शनीदेवांना आपल्या पायाच्या अंगठ्याखाली दाबून ठेवले. शनीदेवांची घुसमट सुरु झाली. त्यांनी ब्रह्मा-विष्णू-महेशाचा धावा सुरु केला. पण या त्रिदेवांनीही असमर्थता दाखवली. शनीदेवांनी ताकद लावून हनुमानाच्या पायाखालून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांची त्वचा सोलकटून निघाली. अंगाची लाही लाही सुरु झाली शनीदेवांनी भक्तांचा पुकारा केला. त्यांना अंगावर तेल ओतण्यास सांगितले. तेल टाकताच शनीदेव भक्तांवर प्रसन्न झाले. शेवटी त्यांनी हनुमानाची प्रार्थना केली आणि माफी मागितली. पुन्हा त्रास देणार नाही ना असे हनुमानांनी विचारले. त्यावर तुमच्याकडे काय पण तुमच्या भक्तांकडेही वाकड्या नजरेने पाहाणार नाही, असे शनीदेवांनी उत्तर दिले. तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली की साडे सातीचा काळ सुरु झाला की हनुमानाला प्रसन्न करा, शनी तुमच्या जवळही फिरकणार नाही. तेव्हा भक्तांनी तेल ओतताना लक्षात ठेवावे की आपण हनुमानावर तेल नाही तर शनीवर तेल ओतत आहोत.  म्हणूनच हनुमानाच्या पायावरच तेल अर्पण करावे. कारण तेलाची गरज हनुमानाला नाही तर शनीदेवाला तेलाची गरज आहे.

- Advertisement -

जय श्रीराम, जय हनुमान


Adv. पुनीत चतुर्वेदी – (लेखक हे मुंबई हायकोर्टात Advocate आणि धर्मशास्त्राचे प्रवचनकार आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -