१२ वी गणिताची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

इयत्ता १२ वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

maharashtra board examination student gets 10 minutes more in ssc and hsc exam

12th EXAM मुंबई – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत ०३ मार्च रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संबंधित घटनेबाबत सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

विधिमंडळातही गदारोळ 
१२वीचा गणिताचा पेपर फुटला अशी चर्चा विधानसभेतही झाली. माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले.
आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी ११ वाजता पेपर सुरू होण्याच्या अर्धातास आधीच बुलढाण्यात पेपर फुटला. ही माहिती विरोधी पक्षनेते यांना कळताच त्यांनी लागलीच विधानसभेत याची माहिती देऊन संताप व्यक्त केला. “गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला. अभ्यास करणाऱ्या मुलांचं यामुळे किती वाटोळे होते. सरकार झोपलंय की काय, काय चाललंय कळत नाही. मी बोललो की बोलता दादा दादा बोलतात,” अशा संतापलेल्या सुरात त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचे प्रश्न
अजित पवारांनी पेपरफुटीचा मुद्दा मांडताच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही सभागृहात गोंधळ केला. या सरकारच्या काळात परीक्षा सुरू झाल्यापासूनच सातत्याने समस्या सुरू आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरात दोन दोन गुणांचे तीन प्रश्न चुकीचे आले. त्यानंतर मराठीच्या पेपरएवजी इंग्रजीचा पेपर मुलांना मिळाला. आता तिसरी घटना म्हणजे बुलढाण्यात पेपर अर्धातास आधीच फुटला आहे. हे सरकार नक्की करतंय काय? कॉपीमुक्त परीक्षेसाठी यांनी भरारी पथक नेमले, मोबाईल निषिद्ध केले, दहा मिनिटे आधी पेपर द्यायचा हे ठरवलं गेलं. मग तरीही अर्धा तास आधी पेपर बाहेर गेला कसा? हे पहिल्यांदाच घडलं नाहीय”, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.