घरताज्या घडामोडीएकापाठोपाठ एक घटना सुरूच : राजकीय नेत्यांच्या अपघातांचं सत्र थांबणार कधी?

एकापाठोपाठ एक घटना सुरूच : राजकीय नेत्यांच्या अपघातांचं सत्र थांबणार कधी?

Subscribe

मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या अपघातांचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये. या कालावधीत महाराष्ट्रासह देशातही बड्या नेत्यांचेही अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये सुदैवाने अनेक नेते मंडळी थोडक्यात बचावले आहेत. मात्र काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. नेतेमंडळींचा प्रवास असुरक्षित असेल तर, सर्वसामान्यांची काय कथा? या अपघातांमागील नेमकी कारणं काय? आणि अपघातांचं हे सत्र थांबणार कधी? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे या नेत्यांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने सगळ्या नेत्यांची प्रकृती नीट आहे. मात्र, पुन्हा एकदा अजून एका माजी मंत्र्याचाच अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला आज अपघात झाला आहे. पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या धडकेत दीपक सावंत जखमी झाले आहेत. अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून डॉ. सावंत यांच्या मानेला आणि पाठिला गंभीर दुखापत झाली आहे. कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप

माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना १४ जानेवारीला घडली होती. औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आमदार बच्चू कडू 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या अपघाताची घटना ११ जानेवारी रोजी घडली होती. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले. कडूंना उपचारासाठी नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याचं सांगितलं जात आहे.

आमदार योगेश कदम

माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला ७ जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूरजवळ कशेडी घाटात टँकरने आमदार कदम यांच्या कारला पाठीमागून धडक दिली होती. सुदैवाने आमदार योगेश कदम यांनी कोणताही दुखापत झाली नव्हती, मात्र कारमधील चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला ४ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात अपघात झाला होता. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. मुंडेंवर मुंबईतली ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. १६ दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे

माण तालुक्यातील भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा २४ डिसेंबरमध्ये फलटण तालुक्यात अपघात झाला होता. त्यांची गाडी ५० फूट नदीत कोसळली होती. या अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले होते. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली होती. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान

महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या गाडीला ५ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये अपघात झाला. नसीम खान हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर हा अपघात झाला होता. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाली होती.

आमदार नितेश राणे

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या गाडीला ६ सप्टेंबर रोजी पुण्यात अपघात झाला होता. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यानजीक झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघातावेळी गाडीमधून नितेश राणे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलं, नातेवाईक प्रवास करत होते. पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने राणे कुटुंबीयांच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. ज्यामुळे हा अपघात घडला होता.

खासदार हिना गावित

नंदुरबारच्या खासदार हिना गावित ८ ऑगस्ट रोजी एका खासगी पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात असताना नंदुरबार शहरातील गुरव चौकात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात हिना गावित यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली होती, तर काही कार्यकर्तेही जखमी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांना दोनदा अपघात झाला. ५ जूनला मुख्यमंत्री शिंदे मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला महापालिका मुख्यालयानजीक अपघात झाला होता. या अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांसह सर्वजण सुरक्षित होते. तर, १७ जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर गेले होते. राजभवनहून वर्षा निवासस्थानी परतताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इतर मान्यवरांनाही फटका

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षांत प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन झाले. पालघर येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याआधी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांच्याही गाडीला भीषण अपघात झाला होता आणि त्यात मेटे यांचा मृत्यू झाला. मराठा आरक्षणासाठी झटणारा नेता गेल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना बसप्रवासही जीवघेणा ठरत आहे. नाशिक, पुणे यांसारख्या जिल्ह्यातून सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता नेतेमंडळींसह सर्वसामान्यांचा रस्ते प्रवास सुरक्षित आहे की असुरक्षित?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


हेही वाचा : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -