राऊतांच्या वक्तव्याने अफगाणी संकट आलं, शेलारांचं टीकास्त्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर विविध सामाजिक संघटना आता मुंबईत आंदोलन करत आहेत. या मुद्द्याला धरून आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
भारतरत्न, महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, जाणीवपूर्वक हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सुरु आहे, त्यामागची कारणं अस्पष्ट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण करत अस्मानी सुलतान नाही तर अफगाणी संकट आलं आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

तालिबानच्या भागात गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झाले हे आम्ही पाहिलं, आता शांततापूर्व आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी असलेला समाज आणि त्यातही आमचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावरचा वाद निर्माण करत आहेत, उद्धव ठाकरेंची सेना असे का करतेय? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला आहे.

अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत

आपलं अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही. आम्ही मागेही पाहिलं, डॉक्टर औषधं चांगली देतो की कम्पाऊंडर या वादात पडायचं नाही, त्यांच अज्ञात त्यांनी पाजळलं आहे. WHO चे अॅडव्हायझर कोण असू शकतात त्याचं अज्ञात त्यांनी पाजळलं आहे. पण आता दोन गोष्टी झाल्यानंतर त्यांची मस्ती आणि मिजास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळापर्यंत भ्रम पसरवण्यापर्यंत गेला आहे, असा आरोपही शेलारांनी केला आहे.

खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चुक

खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चुक आहे. खोट पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबासाहेबांबद्दल इतकं अज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला जन्म दिला हे तरी मान्य आहे का? स्वातंत्रपासून नव्या देशाच्या निर्माणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले योगदान तुम्हाला मान्य आहे का? असे उलट सवालही शेलार यांनी केले आहेत.

 नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे

संजय राऊत उद्या सामनात छापून टाकायचे या गोष्टी उद्धवजींमुळेच झाल्या आहेत. संविधान उद्धवजींमुळे झालं, स्वातंत्र्य उद्धवजींमुळे मिळालं असेल, बंधुताही मिळाली असं तर छापणार नाही ना? काय सुरु आहे? हे प्रकरण झाल्य़ानंतर राऊतांनी माफी, दिलगिरी मागितली नाहीच. अहकांराचा हा परमोच्च बिंदू आहे. नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि  हे भाजपला मान्य नाही. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणूकीत पराभव केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी पुढचं पाऊल टाकत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजप या घटनेचा निषेध व्यक्त म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय आहे? असा सवालही विचारला आहे.


मविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा