मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका; म्हणाले…

'काही लोक रस्त्यांचे ऑडिट करतायत, कंत्राटदारांची भाषा बोलत आहेत. यांच्या काळातील काळ्या यादीतील कंत्राटदार काम करत होते. मात्र आता चित्र बदलत असून हीच पोटदुखी आहे काही लोकांची', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

संग्रहित छायाचित्र

‘काही लोक रस्त्यांचे ऑडिट करतायत, कंत्राटदारांची भाषा बोलत आहेत. यांच्या काळातील काळ्या यादीतील कंत्राटदार काम करत होते. मात्र आता चित्र बदलत असून हीच पोटदुखी आहे काही लोकांची’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत शनिवारी चुनाभट्टी येथे आयोजित कार्यक्रमात २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन मसाला कंडाप, घरघंटी मशीनचे वाटप एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Cm Eknath Shinde and Uddhav Thackeray Maharashtra Mumbai)

“मुंबई महापालिकेतही बदल घडत असून मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक झाला आहे. काही लोक रस्त्यांचे ऑडिट करतायत, कंत्राटदारांची भाषा बोलत आहेत. यांच्या काळातील काळ्या यादीतील कंत्राटदार काम करत होते. मात्र आता चित्र बदलत असून हीच पोटदुखी आहे काही लोकांची. मात्र याची पोटदुखी वर उपचार करण्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध आहे, तेथे यांच्यावर उपचार होतील”, असा एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“मुंबईचे सौंदर्यीकरण, सिमेंट क्रॉकिटचे रस्ते, अशी विविध कामे हाती घेतली आहेत. मात्र ज्यांनी २५ वर्षें मुंबई महापालिकेत सत्ता भोगली आज तेच राज्यपालांकडे तक्रार करत आहेत. कॅगचा अहवाल आला असून लवकरच समोर येईल. त्यामुळे राज्यपालांकडे तक्रार करण्याआधी समोरच्यांनी आरशात चेहरा पाहून घ्यावा”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन मसाला कंडाप घरघंटी मशीन देण्यात येणार आहेत. शनिवारी चुनाभट्टी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र २७ हजार महिलांच्या व्हाट अँपवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून त्यांनी आपल्या संबंधित विभाग कार्यालयात प्रमाणपत्र दाखवल्यानंतर यंत्र मिळणार आहे.


हेही वाचा – ‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला