घरताज्या घडामोडीअजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्यावतीने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषेदेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही. कारण खोक्यांचा जर एकावर एक ढिग लावला तर एवढं शिखर उंच होईल की, बघता बघता नजर पोहोचणार नाही आणि पोहोचली तर कडेलोट होईल. त्यामुळे मी यासंदर्भात विधानसभेत बोलेन, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.

हे सरकार खोके, घटनाबाह्य आणि स्थगिती सरकार आहे, असं अजित पवार म्हणाले होते. परंतु मी त्यांना एकच सांगू इच्छितो की, हे सरकार पूर्णपणे बहुमताचं सरकार आहे. बहुमताच्या जोरावर हे सरकार स्थापन झालं आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करुन हे सरकार स्थापन झालं आहे. कोर्टाने विधिमंडळाच्या कारभारावर स्थगिती द्यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता. ते आता टाळण्यात आलंय. जे सरकार २०१९ साली स्थापन झालं. ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं. सोयरिक एकाशी केली आणि संसार दुसऱ्याशी थाटला. हे सर्व जनतेला माहिती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

स्थगितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अनेक विभागात २ हजार कोटींची तरतूद होती. परंतु ६ हजार कोटी, ७ हजार कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हे नेमकं काय सुरू होतं. राज्याचा आम्हाला लवासा कारायचं नाहीये. स्थगितीच्या कामांना आम्ही प्रायोरिटी दिली आहे. जवळपास ७० ते ८० टक्के आम्ही स्थगिती उठवली आहे. तसेच आवश्यक कामांनाही आम्ही मंजूरी दिली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आज दुपारी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून मला विदर्भात येण्याची संधी मिळाली आहे. विदर्भ आणि नागपूर या भागाशी माझे जिव्हाळ्याशी संबंध आहेत. कारण गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून मी काम पाहिलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन फार महत्त्वाचं आहे. हे अधिवेशन किती चालवावं यावर विरोधी पक्षांनी जो काही आग्रह धरला होता, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मागील सरकारने कोविडचं कारण देऊन हे अधिवेशन नागपुरात घेणं टाळलं आहे. हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही माहिती आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलू इच्छित नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

आनंदाचा शिधा पोहोचलं नसल्याचं भाष्य विरोधकांनी केलं. पण, माझ्याकडं आकडेवारी आहे. या सरकारनं सगळे सण, उत्सव जोरात साजरे झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. १०० रुपयांत रवा, साखर, तेल, डाळ देऊन सामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. नुसत्या घोषणा दिल्या नाही. तर ९६ टक्के लोकांना शिधा पोहोचला आहे. विदर्भासाठी जे काही करता येईल, ते आम्ही करु. विदर्भात ६ प्रकल्प आहेत. त्यासाठी सरकार जनतेच्या मागे आहे. पाच महिन्यात जर एवढं काम केलं तर पुढील किती होईल, याची धास्ती आमच्याकडे आहे, असंही शिंदे म्हणाले.

जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आहे. हा प्रश्न फार गांभीर्याने घेण्यात आला आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना, सुविधा मागील काळात बंद करण्यात आल्या होत्या, त्या सुविधा, योजना आमच्या शासनाने पुन्हा सुरू केल्या आहेत. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी साधारण २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील ४८ गावांना पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातील दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमच्या शासनाने सगळे सण, उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. फक्त शंभर रुपयांमध्ये गोरगरिबांना दिवाळी साजरी करता आली. यासाठी आनंदाचा शिधा योजनेतील अन्नधान्याचे 96 टक्के लोकांना वितरण झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषित केले.


हेही वाचा : मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ लोकायुक्तांच्या कक्षेत- देवेंद्र फडणवीस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -