घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

Subscribe

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपलेली दिसत आहे. या दोघांमधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्ते आणि पुलाच्या कामावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत सणसणीत उत्तर दिलंय.

मुंबईतील रस्त्याची आणि पुलाची कामे दोन आठवड्यापासून खडीच्या पुरवठ्या अभावी ठप्प झाली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा खडी पुरवठा कंत्राटामध्ये हस्तक्षेप असून त्यांच्याच कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी सरकारचा दबाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वरळीतील डिलाईल रोड येथील पूलाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. खडीच्या टंचाईमुळे काम आणखी उशिराने पूर्ण होणार असल्याची चिन्हं असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

- Advertisement -

आज मुंबईत नगरविकास दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता हे उत्तर दिलंय. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “सरकार आल्यानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा हा निर्णय आम्ही घेतला. आता रस्त्यांची कामेही सुरू झाली आहेत. काल कुणीतरी म्हणत होतं, काम सुरू झालं नाही म्हणून…मी आता रात्री कधीतरी येणार आहे वरळीत फिरायला…तुम्हाला माहितेय मी कधीही येऊ शकतो. त्यामुळे पुढच्या दोन अडीच वर्षात कॉंक्रीटचे रस्ते १०० टक्के पूर्ण होणार आणि मुंबई खड्डेमुक्त होणार म्हणजे होणार…”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या खास अंदाजात हे उत्तर दिलंय.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांवर निशाणा साधायला विसरले नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा मुंबईत आल्यामुळे काहींना पोटदुखी झाली असल्याची टीका यावेळी एकनाथ शिंदेंनी केलीय. तसंच पोटदुखीसाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केलेला आहे, असंही म्हणायला ते विसरले नाहीत. यावेळी बोलताना पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरविकास खात्याचा जवळपास १५ हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर केला. शेवटी डबल इंजिनचा फायदा होतो.” तसंच पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये कॉंक्रीटचे रस्ते होणार, असं देखील ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज कुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगरानी, नगरविकास विभाग २ चे सोनिया सेठी, किरण कुळकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -