घरताज्या घडामोडीनार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

Subscribe

माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं. जे असतं ते खुल्या दिलाने आपल्याला सांगतो. माझा स्वभाव लपवून ठेवण्याचा नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे माहिती नाही असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू, अत्यंत जवळचे असणारे स्वियसहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा मीडियातूनच पुन्हा सुरु झाली आहे. काही प्रसारमाध्यमांनी तर बुधवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यात त्यांचा प्रवेश होईल अशा वावड्या उठवणाऱ्या बातम्याही दिल्या. अखेर यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं अशी प्रतिक्रिया देत नार्वेकर यांच्या संभाव्य शिंदे गटातील प्रवेशाला पूर्णविराम दिला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे सभेत बोलताना मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली होती. यावरुन राजकीय वर्तुळात नार्वेकरांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. नार्वेकर वेगळ्या विचारात आहेत का असे तर्क लावण्यात येत होते परंतु यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच भाष्य केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवसेनेत उठाव केल्यानंतर त्यांच्यासोबत आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी आले. यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळची आणि घरातील माणसेसुद्धा शिंदेंना पाठिंबा देत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर वेगळ्या विचारात असून ते शिंदे गटात येतील अशी चर्चा जोरदार सुरु आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवली यावरुन सर्वत्र चर्चा सुरु झाली होती.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वियसहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा मीडियातून जोरात सुरू आहे. सध्या मिलिंद नार्वेकर कुठेत?, असा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांना पडलाय. काही मीडियातून नार्वेकर हे दसरा मेळाव्याला शिंदे गटात प्रवेश करतील अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, मिलिंद नार्वेकर हे सध्या नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरात देवींचा आशीर्वाद घेत आहेत. नुकतेच त्यांनी टेंभीनाक्यावरील दुर्गेदुर्गेश्वरी त्यानंतर कोल्हापूर येथील करवीर निवासीनी महालक्ष्मी यांचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवारी नार्वेकर हे तरूपती येथील गरूड वाहन समारंभात दिसले. त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सुद्धा सपत्नीक देवाचे दर्शन केले. मीडियामधून जरी नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ते बालाजी चरणी भक्तीत दंग असल्याचे दिसते. नार्वेकर ट्वीटमध्ये म्हणतात, मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरूमला तरूपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्या समवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिलिंद नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंना विचारले असता ते म्हणाले की, त्याची मला माहिती नाही. मी काही लपवून ठेवत नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं. जे असतं ते खुल्या दिलाने आपल्याला सांगतो. माझा स्वभाव लपवून ठेवण्याचा नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे माहिती नाही असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. तसेच मी मुख्यमंत्री असल्यामुळे अनेकजण मला भेटण्यासाठी येत असतात, त्यांच्या कामानिमित्त ते माझी भेट घेत असतात परंतु त्यांच्याबाबत माझ्याकडे सध्या माहिती नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

..म्हणुन मिलिंद नार्वेकरांची चर्चा सुरु झाली

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे संघर्ष निर्माण झाला आहे. तसेच दोन गट पडले आहेत. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर गुजरातला गेले होते. यानंतर मिलिंद नार्वेकरसुद्धा शिवसेनेत फारसे सक्रिय नसल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतलं होते. याची माहिती गुप्त होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना नार्वेकरसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले असल्याचे सांगितले. यानंतर मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अनेक कंड्या पिकवण्याचे काम सुरु होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेमुळे याला पूर्णविराम लागला आहे.

ज्यांच्यामुळे आम्ही तुमच्यात आलो त्यांना आणू नका – आमदार

शिवसेनेतून बंडखोरी करुन शिंदे गटात काही आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीला वैतागून आले आहेत. शिवसेनेत मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत अनेक आमदारांना तक्रार होती. नार्वेकरांमुळे शिवसेना सोडलेल्या आमदारांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नार्वेकर यांना पक्षात घेऊ नका अशी मागणी केली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. नार्वेकरांना विरोध असल्यामुळे त्यांचा प्रवेश लवकर होईल असे वास्तविक दिसत नाही. मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री सर्वश्रूत असून ती फार जुनी आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली असं अजिबात नाही. शिंदे-नार्वेकर यांच्या मैत्रीबाबत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसुद्धा जाणून आहे. परंतु नार्वेकरांच्या कार्यपद्धतीला वैतागलेल्या आमदारांचा मुख्यमंत्री शिंदेंकडे त्यांना शिंदे गटात न घेण्याचा एकच सूर आहे.


हेही वाचा : मल्लिकार्जुन खर्गेंनी सोडलं विरोधी पक्षनेतेपद, सोनिया गांधींकडे सुपूर्द केला राजीनामा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -