कसबा निवडणूक : रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करा – भाजपची मागणी

धंगेकराचे उपोषण हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपने केला आहे. धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार आयोगाकडे करण्यात आली आहे.

पुणे – कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By-poll Election) मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपने पोलिसांच्या साथीने पैसे वाटल्याचा आरोप धंगेकरांनी केला. त्याविरोधात शनिवारी कसबा गणपती येथे उपोषण करण्यात आले. धंगेकराचे उपोषण हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपने केला आहे. धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार आयोगाकडे करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
कसबा पोटनिडणुकीसाठी उद्या (२६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने कसबा पेठेत पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील त्यांनी सादर केला. भाजप पैसे वाटप करत असताना पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी त्यांना साथ दिल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे. शनिवारी सकाळी त्यांनी कसबा गणपती येथे सपत्निक उपोषण सुरु केले. हातात संविधानाची प्रत घेऊन धंगेकरांनी उपोषण सुरु केले. यावेळी त्यांनी भाजपकडून लोकशाहीची हत्या सुरु असल्याचे म्हटले.
धंगेकरांच्या उपोषणाची पोलिस प्रशासनाने दखल घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी धंगेकरांची भेट घेऊन चौकशीचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

हेही वाचा : कसब्यात पोलिसच पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटप करतायत; संजय राऊतांचा आरोप

धंगेकरांची उमेदवारी रद्द करा – राजेश पांडे 

धंगेकरांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळक यांनी म्हटलं आहे. तर भाजप नेते राजेश पांडे यांनी धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. रवींद्र धंगेकरांनी उपोषण करत निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या सभेतून धार्मीक ध्रुवीकरणचा प्रयत्न झाल्याचाही आरोप पांडे यांनी केलाय. मुस्लीमांनी आपल्या बांधवांना दुबई आणि सौदीतून मतदानासाठी आणावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेत करण्यात आले होते. हे धार्मिक ध्रुवीकरण आहे. याचाही विचार आयोगाने करावा अशीही मागणी राजेश पांडे यांनी केली आहे.

कसबा निडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपकडून हेमंत रासणे तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. दोन्ही उमेदवार हे माजी नगरसेवक असून ओबीसी समाजाचे आहेत. कसबा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो, येथे भाजपने प्रथमच येथे ओबीसी उमेदवार दिला आहे.

हेही वाचा : मविआचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचे उपोषण