घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : सर्व्हेच्या आधारे भाजपा-आरएसएस 36 जागांसाठी आग्रही, शिंदे-दादांना कमी...

Lok Sabha 2024 : सर्व्हेच्या आधारे भाजपा-आरएसएस 36 जागांसाठी आग्रही, शिंदे-दादांना कमी जागा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकांची तारीख आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व पक्ष त्यासाठी सज्जता करत असले तरी ‘फेव्हिकॉल’चा जोड म्हणविणाऱ्या महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपात सहमती बनत नसल्याचे सांगण्यात येते. राज्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे भाजपा किमान 36 जागा लढविण्यासाठी आग्रही आहे. तर, शिंदे गट तसेच अजित पवार गटाला मिळून जास्तीत जास्त 12 जागा सोडण्याची तयारी भाजपाची आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही पुष्टी मिळाली असून मित्रपक्षांसाठी वेगळा पर्याय दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपाने जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीतील आपल्या संभाव्य यशाची चाचपणी करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण केले होते. शिवाय, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टीमने देखील महाराष्ट्रात भाजपाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना दिला होता. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदारनिहाय पाहाणी केली होती. त्यानुसार, भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हाला जनतेचा कौल मिळू शकतो, इतर दोन मित्रपक्षांच्या उमेदवारांबाबत विजयाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज बांधण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महायुतीत कोणाला कशा मिळणार जागा; अजित पवारांनी सांगितला तोडगा

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यावेळी सुद्धा 23 जागा हव्या आहेत. तर, शिंदे गटाएवढ्या जागा आम्हालाही मिळायला पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने मांडली आहे.

- Advertisement -

पण प्रत्यक्षात मात्र, भाजपा या दोन्ही पक्षांना मिळून 10 ते 12 जागांपेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याचे सांगण्यात येते. भाजपाने यंदा ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील 45 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट्य भाजपाचे आहे. मात्र, राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला तेवढ्या जागा मिळणे कठीण दिसत आहे. आपापल्या पक्षात केलेल्या बंडामुळे एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गट यांना जनाधार मिळण्याची शक्यता फारशी दिसत नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याशी लढत देताना शिदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – Thackeray on BJP : संविधानाचा खून करण्यासाठी 400 मारेकरी तयार…; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशिव आणि परभणी या पाच जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. या जागा भाजपाला हव्या आहेत. ठाणे किंवा कल्याण भाजपाला हवी आहे. कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे खासदार असल्याने कदाचित एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे भाजपाला मिळेल, असे सांगितले जाते. शिंदे गटाच्या उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि हिंगोली या तीन जागाही भाजपाला हव्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिथे शिंदे गटाचे अनुक्रमे गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील हे खासदार आहेत. त्यापैकी हिंगोली येथे माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरतील, असा अंदाज आहे.

पालघरच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची ही पारंपरिक जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तरी, भाजपा नेते राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले. महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितच असतील आणि ते धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. आता राजेंद्र गावितच निवडणूक लढतील, पण भाजपाच्या तिकिटावर अशी शक्यता आहे. त्याचबरोबर, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने भाजपाचे दिवंगत खासदार विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा तसेच संतोष जनाठे यांचा विचार होऊ शकतो.

हेही वाचा – Ajit Pawar : विजय शिवतारेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची महायुतीच्या नेत्यांना समज; म्हणाले…

शिंदे गटातील नेत्यांचा जीभेवरील सुटलेला ताबा, भाजपाच्या तुलनेत जनसंपर्क कमी अशा बाबी तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची लोकांच्या मनातील भावना अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या उमेदवारांचा निभाव लागणे कठीणच असल्याचे भाजपाच्या थिंक टँकचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते. तर, अजित पवार यांच्याकडे चारपैकी केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. तर, उर्वरित श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अद्यापही खासदार शरद पवार यांचे समर्थक आहेत. त्यातही शरद पवार हे स्वत: मैदानात उतरल्याने अजित पवार गटासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

अशा परिस्थितीत भाजपाने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही आहे. 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी दोन्ही गटांना नाममात्र जागा देऊन त्यांच्या काही नेत्यांना भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगितले जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

हेही वाचा – Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता…; वसंत मोरेंचा फेसबूक पोस्टमधून इशारा, पण रोख कोणावर?

महायुतीची यादी 15 तारखेपूर्वी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची जागावाटपासंदर्भात काल, सोमवारी बैठक होणार होती. पण भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्याने जागावाटपाचा तिढा तसाच राहिला. मात्र, यात महाराष्ट्रातील भाजपाच्या 25 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या 15 मार्चपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Maha Politics : अजित पवार गटातील 12 बडे नेते भाजपात जाणार; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा भूकंप?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -