घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : शरद पवार गटाकडून 10 पैकी 9 उमेदवार जाहीर,...

Lok Sabha 2024 : शरद पवार गटाकडून 10 पैकी 9 उमेदवार जाहीर, तिसऱ्या यादीत सातारा, रावेर; माढाचा तिढा कायमच

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अजुनही एका जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केलेला नाही. माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे, येथे अजून त्यांचा उमेदवार ठरलेला नाही.

- Advertisement -

माढाची प्रतीक्षा कायम 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी 30 मार्च रोजी प्रसिद्ध झाली होती. दुसरी यादी चार एप्रिलला जाहीर करण्यात आली. काल 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा सोडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी पवारांनी पहिल्या आणि दुसऱ्या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर केलेली होती. उर्वरीत तीन मतदारसंघ ज्यामध्ये सातारा, रावेर आणि माढाचा समावेश होता, येथील उमेदवारांची घोषणा केव्हा होणार याची प्रतीक्षा होती.

सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. 2009 पासून हा मतदारसंघ पक्षाने कायम ठेवला आहे. सुरुवातीला उदयनाराजे येथून खासदार होते. 2019 मध्ये त्यांनी खासदार पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांचे मित्र आणि माजी आयएएस अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून उदयनराजेंना चीतपट केले. श्रीनिवास पाटील यांनी 2024 निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी निवडणूक लढण्यास नकार दिला त्यामुळे पवारांना येथे उमेदवाराची चाचपणी करावी लागली. अखेर शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

- Advertisement -

दरम्यान महायुतीकडून अद्याप येथे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. उदयनराजे हे तीन दिवस दिल्लीत मुक्कामी थांबून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आले. मात्र अजुनही त्यांच्या नावाची घोषणा भाजपकडून झालेली नाही. महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावरच महायुती उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माढा लोकसभा मतदार संघ

या मतदारसंघात शरद पवार मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ती खेळी पूर्ण होण्यापूर्वी चर्चाच अधिक झाल्यामुळे पवारांवरच डाव उलटला. भाजप सोबत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा देण्याची तयारी शरद पवारांनी केली होती. मात्र भाजपने जानकरांना परभणीतून उमेदवारी देऊन पवारांचे मनसुबे धुळीस मिळवले.
भाजपने येथून विद्यामान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना महायुतीमधून विरोधही होत आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांकडे आहे. जानकर परभणीत गेल्यानंतर आता पवार आणखी एका भाजप नेत्यावर डाव लावण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पवार गटाकडून चर्चेत आहे. मोहित घराण्याला तिकीट मिळाले नसल्यामुळे त्यांची नाराजी आहे. मोहित पाटील हे पूर्वी शरद पवारांच्यासोबतच काम करत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला तर ते स्वगृही परतले असेच म्हणता येईल. याशिवाय अनिकेत देशमुख, अभयसिंह जगताप यांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.

हेही वाचा : Supriya Sule : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई गरजेची; सुप्रिया सुळेंनी मनुगंटीवारांवर साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -