घरमहाराष्ट्रकसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट; 'या' पक्षाला देणार पाठिंबा

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट; ‘या’ पक्षाला देणार पाठिंबा

Subscribe

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेकडून या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे.

26 फेब्रुवारीला पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल. याचा निकाल 2 मार्चला जाहीर करण्यात येईल. या निवडणुकांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश येईपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. पण आता राज ठाकरे यांच्याकडून पुढील आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार असली तरी मनसेचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी हे प्रचारात सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्याकडून देण्यात आली आहे. पुण्यातील स्थानिक नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेत राज ठाकरे यांनी आपला कल हिंदुत्व आणि विकासाच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे, प्रदेश नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली. यावेळी वागस्कर यांनी मनसेचा पाठिंबा भाजपला असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – Live Update : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज होणार पुन्हा सुनावणी

- Advertisement -

दरम्यान, याआधी राज ठाकरे यांनी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत व्यक्त केले होते. अशा आशयाचे पत्र देखील त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना पाठवले होते. पण या पत्राला कोणत्याही पक्षाकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आता मनसेकडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये या विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न दिल्याने जनतेकडून नाराजी व्यक्त कऱण्यात आली आहे. भाजपने या मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर ही निवडणूक लढवणार आहेत. तसेच चिंचवड विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचे सध्या दिसून येत आहे. या मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. परंतु महाविकास आघाडीने तिकीट नाकारल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -