घरमहाराष्ट्रकोणतीही देवी गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही, 'सामना'तून शिंदे गटावर टीका

कोणतीही देवी गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही, ‘सामना’तून शिंदे गटावर टीका

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे थैमान सुरू आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण हवालदिल झाले आहेत. ‘गोवर’च्या साथीने शेकडो मुले बेजार झाली आहेत. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर व सांगलीतील ‘जत’वर दावा सांगून खळबळ उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक सुरू असल्याने राज्याची जनता अस्वस्थ तितकीच संतप्त आहे. असे सगळे घडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री त्यांच्या गटाच्या तीसेक आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

‘हे’ महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस न शोभणारे
अशी आख्यायिका आहे की, कामाख्या देवीच्या मंदिरात ‘बळी’ प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. (खरे खोटे 40 खोके आमदारांनाच माहीत) महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बकऱ्यांचा बळी दिला जातो व त्या अंधश्रद्धेस सगळ्यांचा विरोध आहे, पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यात अनेक शक्तिपीठे असतानाही…
मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते, अशी खोचक टीका शिंदे गटावर केली आहे.

- Advertisement -

ही तर वैयक्तिक पूजा
मिंधे गटाचे आमदार म्हणतात, ‘देवीच्या दर्शनावरून खिल्ली उडवाल तर तुमच्यावर कोप होईल. देवीचा नवस फेडायला आम्ही आलोय’, मात्र हे साफ खोटे आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवस वगैरे करण्याचा या लोकांना अधिकार नाही. आषाढी-कार्तिकेस पांडुरंगाची महापूजा घातली जातेच व तेव्हा देवाला साकडे घातले जाते. कामाख्या देवीची पूजा ही वैयक्तिक असू शकेल, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

देवीचा आशीर्वाद कसा मिळेल?
मिंधे गटाचे एक आमदार योगेश कदम देवीचे नाव घेऊन धमकी देतात की, ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही. कोप होईल कोप.’ अर्थात हे सर्व मिंधे गटानेच लक्षात घ्यायचे आहे. मिंधे गटापाशी आज कोणतेही पुण्य उरलेले नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची अखंड बदनामी सुरू आहे. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहेत. तेव्हा नवस बोलायचा तर तो या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकविण्यासाठी बोलायला हवा, पण त्याऐवजी या मंडळींनी नवस केला आहे आणि बळी दिलाय तो आपली सत्ता टिकविण्यासाठी. मग या मंडळींना देवीचा आशीर्वाद कसा मिळणार? असा सवालही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -