घरताज्या घडामोडीMNS with Mahayuti : ठरलं! मनसे महायुतीमध्ये, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी?

MNS with Mahayuti : ठरलं! मनसे महायुतीमध्ये, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी?

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणूक तारखांची घोषणा शनिवारी दुपारी होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असाच दुरंगी सामना बहुतेक मतदारसंघामध्ये रंगण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याचे निश्चित मानले जात आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रावादीला हव्या असलेल्या जागा देण्याचे धोरण ठरले आहे. त्यासोबतच महायुतीमध्ये मनसेला सहभागी करुन घेत भाजप त्यांना दोन ते चार जागा देणार असल्याचं ठरलं असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

महायुतीचे जागावाटप निश्चित

महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून भाजप 30, शिंदे गट 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4 आणि मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला निवडून येऊ शकतील अशाच जागा देण्याचे ठरले आहे. मनसेला महायुतीत सहभागी करुन घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील एक आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील एक लोकसभा मतदारसंघ मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -
राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता
राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

बाळा नांदगाकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असलेले पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील माझगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत. तर मनसेच्या वाट्याला दुसरा मतदारसंघ हा नाशिक असणार आहे. नाशिककरांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वात प्रथम मनसेला सत्ता दिली होती. येथे पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे नाशिक मतदारसंघ मनसेला दिला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघ सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. येथे अरविंद सावंत दोन वेळा खासदार राहिले आहेत. महायुतीत या जागेची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली होती. भाजपकडून येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर इच्छूक आहेत. पक्षांतर्गतच त्यांना मंगलप्रभात लोढा यांचा सामना करावा लागत आहे. मात्र भाजपने ही जागा मनसेला देण्याचे निश्चित केले आहे. मनसेकडून येथे बाळा नांदगावकर उमेदवार असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मनसे शिंदे गटासाठी ठाणे, कल्याणमध्ये लाभदायक

मुंबईतील शिवसेनेच्या ताब्यातील दोन मतदारसंघ भाजपला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि कल्याण मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. मनसेला सोबत घेतल्यास महायुतीला फायदा होईल असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे खासदार आहेत. आगामी निवडणुकीत तीन आमदार त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आणि श्रीकांत शिंदेंना कल्याणध्ये त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता शिंदे गटाने वर्तवली आहे.

Thackeray group leader Sanjay Raut criticizes Raj Thackeray Devendra Fadnavis meeting

शिवतीर्थवरील बैठका फळाला

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने राज्यात 45+चे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी त्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही महायुतीत सहभागी करुन घेतले आहे. राज ठाकरे यांचा मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या महानगरामध्ये भाजपला फायदा होऊ शकतो, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यासाठीच गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे शिवतीर्थवर येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही राज ठाकरे यांच्या भेटी-गाठी गेल्या काही महिन्यात वाढल्या होत्या. या सर्व भेटीगाठी आणि वारंवार होणाऱ्या चर्चा आता फळाला आल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरेंची अटही मान्य!

राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवल्याचेही बोलले जात आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसोबतची ही महायुती केवळ लोकसभेपुरती राहणार नाही याची काळजी भाजपने घ्यायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणुकीतही मनसेला सन्मानाने सहभागी करुन घेण्याच्या पूर्वअटीवरच मनसेचा महायुतीत सहभाग झाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : एकनाथ शिंदेंनी गड राखला पण सिंह गमावला; मुंबईतील दोन जागा भाजपला देणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -