घरताज्या घडामोडीवारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य

वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु राजकीय पक्षातील बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर राजकीय नाट्यावर पडदा पडला. यावेळी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं आहे. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं अग्रलेखातून म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटयावर पडदा पडला आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार…

पवार यांनी जे राजीनामा नाट्य केले ते ‘नौटंकी’ होते, अशी टीका भाजपने केली. भारतीय जनता पक्ष हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. दुसरे असे की, इतरांवर ‘नौटंकी’ असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळ्यात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची ‘नौटंकी’ करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

- Advertisement -

पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला. जिल्हा, तालुका स्तरातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्याच्या हट्टावर कायम राहिले. पवारांच्या घरासमोर, कार्यालयासमोर झुंडी जमल्या. याचा अर्थ असा की, पुढारी म्हणजे पक्ष नाही. त्यांचे पर्यटन सुरूच असते. कार्यकर्ता म्हणजेच पक्ष. शिवसेनेच्या बाबतीत तेच दिसले. मिंधे गटाबरोबर आमदार-खासदार गेले, पण निवडणूक आयोगाने पक्ष त्यांना देऊनही त्यांचा तंबू रिकामाच राहिला आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा : शरद पवार पुन्हा भिजले पावसात, सोलापुरात अवकाळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -