Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी नाक मुठीत धरूनच 'त्या' 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल; 'सामना'तून शिंदे सरकारवर...

नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल; ‘सामना’तून शिंदे सरकारवर टीका

Subscribe

8 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले.

’38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल. नगर विकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे’, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर करण्यात आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर 38 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. तसेच, खातेवाटपही करण्यात आली आहे. या खातेवाटपामध्ये सर्व महत्वाची वजनदार मंत्रिपद भाजपाकडे आहेत. त्यामुळे शिंदे गटावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. अशातच आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे?

- Advertisement -

महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल. नगर विकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे.

सगळी प्रमुख खाती फडणवीस व त्यांच्याच लोकांच्या मुठीत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल, पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने हे सर्व ते सहन करतील! शिंदे म्हणून जो काही एक गट निर्माण झाला त्यातील काही लोकांना मंत्रीपदे मिळाली. यावर उरलेल्यांनी लगेच नाराजी व्यक्त करून मंत्रीपदाच्या इच्छा जाहीर केल्या. शिंदे गटाचे संभाजीनगरचे आमदार शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ‘‘मला कॅबिनेट मंत्रीपद आणि संभाजीनगरचे पालक मंत्रीपद हवे म्हणजे हवेच!’’ काल-परवा आलेल्या टोपी फिरवू दीपक केसरकरांना मंत्रीपद मिळते, मग आम्हाला का नाही? असे शिरसाट म्हणतात.

- Advertisement -

यावर केसरकर ‘हपापाचा माल वाटपा’चे मालक असल्यासारखे आश्वासन देतात, ‘‘शिरसाटांनाही पुढच्या विस्तारात नक्कीच मंत्रीपद मिळेल!’’ केसरकर, सामंत यांच्यासारखे अनेक राजकीय बाहेरख्याली कधी इथे तर कधी तिथे व कुठेच जमले नाही तर शिंदे गटाच्या गुळास जाऊन चिकटत असतात. त्यामुळे शिरसाट-गोगावले अशा गट निष्ठावंतांचे वांधेच झाले म्हणायचे. शिरसाट या भानगडीत इतके बावचळले की, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचे जाहीर केले व नंतर सारवासारव करीत हा आमचा टेक्निकल लोचा असल्याचे सांगितले. मात्र शिरसाट यांनी शिंदे यांच्या गटातील

50 जणांची ‘खदखद’च एकप्रकारे व्यक्त केली. प्रत्येकाला काही ना काही तरी मिळायलाच हवे अशी शिंदे गटातील सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता या पन्नास जणांना काही ना काही हवे म्हणजे काय? फूल ना फुलाची पाकळी तरी म्हणे आपल्याला मिळावी, असे ते म्हणत आहेत. मग आता यातील फुले कोणास? पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार? हे प्रश्न आहेतच. या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच. नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले.

पुन्हा ही पहिल्या विस्तारानंतरची भानगड आहे. दुसऱ्या विस्तारानंतर शिंदेंच्या गावात व गटात रोज बारा भानगडींना तोंड फुटेल व प्रत्येक भानगडबाजास खोकीवाटप करताना केस-दाढी गळून जाईल. शिंदे गटाचे मंत्री जिथे जातील तिथे निदर्शने होत आहेत. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तेथे ट्रकभर फुले त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी व लफडी करून आले असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण? मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना बोलावून समज दिली की, वेडीवाकडी कामे करू नका. असे काही केलेत तर पाठीशी घालणार नाही. कोणतीही भानगड खपवून घेतली जाणार नाही. हे शिंदे यांनी सांगावे? कमाल आहे! मुळात स्वतः शिंदे व त्यांचा गट हीच एक भानगड आहे. प्रत्येकाला लालूच दाखवून फोडले आहे.

पैसा, लाभाची पदे व ईडीचा धाक यातून हे शिंदे गटाचे भानगडबाज सरकार आले. आता या गटास सांभाळण्यासाठीही भानगडींचाच आश्रय त्यांना घ्यावा लागेल. आता म्हणे हे गटवाले मुंबईत व अनेक ठिकाणी प्रति-शिवसेना भवन उभारणार. त्या प्रति-शिवसेना भवनात शिंदे गटाचे शेणापती जाऊन बसणार. म्हणजे हे लोक आता प्रतिसृष्टी उभी करण्याची भानगड करू लागले आहेत. पुराणात देवादिकांना आव्हान देत कोणी तरी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची भानगड केली होती. त्या प्रतिसृष्टीचे पुढे काय झाले, याची माहिती दादरच्या सदोबा हगवणकराने घ्यावी. काहींनी प्रतिपंढरी, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे निर्माण करून तुंबड्या भरल्या, पण श्रद्धेचे व निष्ठेचे स्थान एकच असते. शिवसेनेच्या बाबतीत तर तेच प्रखर सत्य आहे. तेव्हा या सत्याच्या प्रखर तेजाकडे बघण्याचा प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये. पुन्हा आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. 56 वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे. शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही. भारतीय जनता पक्षाला मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवायचा आहे. मराठी माणसाला गुलाम-लाचार करून मुंबई गिळायची आहे व त्याकामी शिंदे गटाची भानगड त्यांनी निर्माण केली. ही बाब गंभीर आहे. शिंदे गटाच्या भानगडीस संजय शिरसाट यांनी तोंड फोडले.

‘ह्योच नवरा पायजे’च्या तालावर ते म्हणाले, ‘‘मंत्रीपद आता हवेच.’’ पन्नास जणांना हवे म्हणजे हवेच. चला, या निमित्ताने एक जळजळीत सत्य बाहेर आले. शिंदे गटाने शिवसेना सोडताना स्वाभिमान, हिंदुत्व वगैरेंचा जो मुद्दा समोर आणला तो सपशेल झूठ आहे. जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति-शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे?


हेही वाचा – मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -