घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफडणवीसांच्या अध्यक्षतेतील कार्यक्रमात आ.खडसेंची अचानक उपस्थिती

फडणवीसांच्या अध्यक्षतेतील कार्यक्रमात आ.खडसेंची अचानक उपस्थिती

Subscribe

नाशिक : येथे आयोजित अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे फडणवीसांच्या अध्यक्षतेतील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हेदेखील मंचावर हजर झाल्याने सर्वच उपस्थित अवाक् झाले. संमेलनाच्या पत्रिकेत खडसेंचे नाव नसताना खडसे मंचावर उपस्थित कसे झाले, असे कोडे आयोजकांना पडले होते.

नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संमेलनाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. अशातच मंचावर एकनाथ खडसेही उपस्थित असल्याने आयोजकांनाही धक्का बसला. कार्यक्रम पत्रिकेत किंवा व्यासपीठावरील होर्डिंगवर खडसेंने नाव नसतानाही खडसे हजर झाल्याने व्यासपीठावर राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार अशीच चर्चा उपस्थित पदाधिकार्‍यांमध्ये रंगली. हा कार्यक्रम राजकीय नसला तरी, नाही म्हटले तरी आयोजकांपैकी प्रमुख पदाधिकारी हे भाजप संलग्न होते. यापैकी खडसेंना कोणी आमंत्रण दिले अशीही चर्चा यावेळी रंगली होती. भाजपमधून बाहेर पडताना फडणवीस यांच्यावर खडसेंनी आरोप केले होते. महाजन आणि खडसेंमधील वाद तर सर्वश्रुतच आहे. अशातच हे तीनही नेते एकाच मंचावर असल्याने हे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, तीनही नेत्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत व्यासपीठावर राजकीय भाष्य टाळल्याने नेत्यांमधील समंजसपणा दिसून आला.

- Advertisement -

फडणवीस, महाजनांनी केले दुर्लक्ष

उपमुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वीच खडसे मंचावर उपस्थित होते. अशातच फडणवीस आणि महाजनांचे आगमन झाले. व्यासपीठावर येताच फडणवीसांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला असता समोर खडसेही उपस्थित असल्याचे पाहून फडणवीस खडसेंना हात जोडत पुढे निघून गेले. महाजनांनी मात्र खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

खडसे पडले एकाकी

दुसर्‍या दिवशी दुपारनंतरचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दीपप्रज्वलनावेळी सर्व नेते उभे असताना खडसे मात्र जागेवर बसून होते. त्यामुळे भाजप नेत्यांच्या गर्दीत खडसे एकाकी पडल्याचे दिसत होते. शिवाय दीपप्रज्वलन करत असताना फडणवीस, महाजन उभे असल्याने त्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे खडसेंना कोणी खुणावल्याचेही दिसले नाही. त्यामुळे व्यासपीठावर खडसे एकाकी दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -