घरमुंबईडी-मार्ट सोबत ठामपाच्या अधिकार्‍यांचा शाळा पाहणी दौरा

डी-मार्ट सोबत ठामपाच्या अधिकार्‍यांचा शाळा पाहणी दौरा

Subscribe

योग्य सुविधा दिल्याशिवाय आपण वर्ग बदलणार नाही, त्यासाठी तुम्हाला देखील निरीक्षण करण्यासाठी बोलावू असे पालकांना आश्वासन देऊनही 27 ऑक्टोबर रोजी अचानक डी मार्टच्या अधिकार्‍यांसोबत शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विकास रेपाळे, शिक्षणाधिकारी पारधे आणि शिक्षण उपायुक्त मनीष जोशी यांनी डवलेनगर, सावरकर नगर येथील शाळेत पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी पालकवर्गाने या विरोधात संबंधितांना विचारणा केली असता थातुरमातुर उत्तरे देत चर्चा टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आधी या शाळेत जिथे लहान मुलांचे बालवाडीचे वर्ग भरतात तिथे डी मार्ट आपले ऑफिस करणार होते. मात्र पालकांच्या विरोधामुळे त्यांना आणि पालिकेला माघार घ्यावी लागली. आता डिजिटल वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि प्रयोगशाळा करण्याच्या नावाखाली हे वर्ग खाजगी संस्थांना, कंपन्यांना देण्याचा डाव आहे. आपली लहान मुले आताच्या जागेत सुरक्षित आहेत. त्यांचे वर्ग शिक्षणयोग्य पद्धतीने रंगविले आहेत. हे वर्ग डी मार्टला दिल्यास मुलांना नवीन जागेत टॉयलेट पासून अनेक असुविधा सहन कराव्या लागतील, मुले असुरक्षित होतील म्हणून पालकांनी हे वर्ग डी मार्टला देण्यास या आधीही विरोध केला होता.

- Advertisement -

तरीही पालकांना आणि येथील नागरिकांना न विचारात घेता अचानकपणे डी मार्टच्या अधिकार्‍यांसह पालिका प्रशासन आणि शिक्षण मंडळ यांनी निरीक्षण दौरा कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मात्र यावेळी पालकवर्गाच्या समवेत आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी डी मार्ट हटाव मनपा शाळा बचाव, आयुक्तांची दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देत विरोध केला. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्ग आणि शिक्षण मंडळाच्या सदस्यांना काढता पाय घ्यावा लागला.

काही सूचना न देता निरीक्षण करतात, कोणतेही लेखी उत्तर देत नाहीत, याचा अर्थ प्रयोगशाळा आणि लायब्ररी सुरू करण्याच्या नावाखाली हे वर्ग सरळ डी मार्टला दिले जातील हे आता स्पष्ट झाले आहे. डवलेनगर, सावरकरनगरची शाळा कोणत्याही परिस्थितीत डी मार्टला विकण्याचा घाट प्रशासनाने आणि शिक्षण मंडळाने घातला आहे.
– गुरू गवळी (स्थानिक कार्यकर्ता)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -