घरताज्या घडामोडीवादग्रस्त टिपू सुलतान उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या, शिवसेना नगरसेवकांची मागणी

वादग्रस्त टिपू सुलतान उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या, शिवसेना नगरसेवकांची मागणी

Subscribe

मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजप – पालकमंत्री अस्लम शेख ( काँग्रेस) यांच्यात वाद झला होता. त्यावेळी नमती भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी, आता या उद्यानाला ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ यांचे नाव देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भांतील प्रस्ताव तयार होत असून लवकरच तो मंजुरीला येणार आहे. सदर प्रस्ताव तयार होऊन त्यास पालिका सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी त्यावर सकारत्मक अभिप्राय दिला तरच त्याची अंमलबाजवणी करता येणार आहे.

येत्या ७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यानंतर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रस्तावावर पालिकेच्या आगामी निवडणुकीनंतरच पुढील निर्णय व कार्यवाही होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसला विश्वासात न घेता सदर उद्यानाला टिपू सुल्तान ऐवजी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या नामकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व शिवसेना यांच्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

वास्तविक, ‘त्या’ उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्यास भाजपचा उघड विरोध होता तर सत्ताधारी शिवसेनेचा दबक्या स्वरातील विरोध होता. मात्र पालकमंत्री अस्लम शेख हे टिपू सुल्तानचे नाव देण्यावर ठाम राहिले होते. त्याबाबत एक कार्यक्रमही घेतला. मात्र त्यानंतर शिवसेना अस्वस्थ झाली होती. मालाड विभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या उद्यानाला ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई ‘ असे नाव देण्याची मागणी केली. त्यानुसार, आता तसा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

वास्तविक, मालाड येथील कलेक्टरच्या मालकीच्या भूखंडावर उद्यान आहे त्याचे सुशोभीकरण पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. सदर उद्यान टिपू सुलतान या नावाने ओळखले जात होते. तसेच, उद्यानाच्या पाटीवर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले होते. टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे, अशी मागणी २७ जानेवारी रोजी केली होती.

- Advertisement -

त्यानंतर पी/ उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, कांदिवलीमधील शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, शिवसेना नगरसेविका गीता भंडारी, शिवसेना नगरसेविका विनया सावंत व उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना नामकरणाबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार, अहवाल तयार करण्यात येत आहे. पुढे तसा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीला आणण्यात येणार आहे.

पी /उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार यांच्यासह सर्व नगरसेवकांची पत्रे बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांना पाठवण्यात आली आहेत. नियमानुसार त्या समितीमध्ये प्रस्ताव आणून मंजूर करतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

समाजवादी पक्षाचा नामकरणाला विरोध

टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी लढा दिला. ते थोर राष्ट्रपुरुष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून टिपू सुलतान यांचे नाव सदर उद्यानाला देण्यात आलेले असताना आता भाजपच्या वाटेने जाणाऱ्या शिवसेनेने ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ यांचे नाव देण्याची मागणी करून राष्ट्रासाठी लढा देणाऱ्या दोन थोर व्यक्तींबद्दल भेदभाव करू नये, असे आवाहन समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी केले आहे. भाजप हिंदुत्ववाच्या नावाखाली टिपू सुलतान यांच्या नावाला नाहक विरोध करून नाहक राजकारण करीत आहे.आता शिवसेनाही तेच करीत असल्याचा आरोप आमदार व गटनेते रईस शेख यांनी केला आहे. शिवसेनेने झाशीच्या राणीचे नाव आणखीन एखाद्या महत्वाच्या वास्तूला द्यावे. मात्र टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करून राजकारण करू नये, असे रईस शेख यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : Nawab Malik ED custody : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, सत्र न्यायालयाचा आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -