सोनार अळीचा रस्ता झाला चकाचक

खडखड नळपाणी योजनेसाठी संपूर्ण जव्हार शहरातील रस्ते खोदून एक वर्ष उलटले. पाणी तर नाही आले, पण रस्त्याची पार चाळण झाली.

खडखड नळपाणी योजनेसाठी संपूर्ण जव्हार शहरातील रस्ते खोदून एक वर्ष उलटले. पाणी तर नाही आले, पण रस्त्याची पार चाळण झाली. दररोज अपघातांना समोर जावे लागत होते. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना पाठीचे आजार जडले. त्यात नवीन नळपाणी योजनेमुळे खोदण्यात आलेल्या साईड खड्ड्यांमुळे धूळ सहन करावी लागत होती. जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोनार आळीत मात्र आता ही समस्या स्थानिक नगरसेवक कुणाल उदावंत यांच्या प्रयत्नाने दूर झाली आहे. शनिवारी त्यांनी स्वतः उभे राहून हा रस्ता डांबरीकरण करून घेतला.

मी माझ्या वॉर्डच्या नागरिकांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. असेच कायम सेवेसाठी तत्पर राहीन.
– कुणाल उदावंत, नगरसेवक, नगरपरिषद, जव्हार

नगरसेवक स्वतः उभे असल्यामुळे कामाचा दर्जाही चांगला असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पाचबत्ती ते दिनकर लासे घरापर्यंत हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. प्रथम रस्त्याच्या कडेला नळपाणी करता केलेल्या खड्ड्यात खडी भरून त्यात डांबर व ग्रीट टाकून खड्डे बुजविण्यात आले. नंतर डांबरीकरणाचे काम करून रस्ता गुळगुळीत करण्यात आला. विशेष म्हणजे नळपाणी योजना कंत्राटदार हा घरांना नळजोडणी करण्याचे काम संथगतीने करत होता. त्याला उदावंत यांनी तातडीने सोनार आळीचे काम पूर्ण करण्यास सांगितले. त्याने कनेक्शन देऊन रस्ता तयार करण्यासाठी मोकळा केला. दरम्यान, मटन मार्केट व नासिर मेमन यांच्या घराशेजारी असलेल्या नगर पालिकेच्या बोळचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक कुणाल उदावंत यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले.

हेही वाचा –

आता नाना पटोले अयोध्या दौरा करणार?, अयोध्येतील महंत बृजमोहन दासकडून निमंत्रण