मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरू झाला होता, मुनगंटीवार यांची टीका

मुंबई : शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. अडीच वर्षे सत्तेवर असताना तुम्ही खरेच काम केले का? लोकांच्या प्रमोशनच्या फाइल पडून राहिल्या. मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरू झाला होता, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

विधानसभेत आज शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. सरकारच्या बाजूने 164 तर, विरोधात 99 आमदारांनी मतदान केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाषण करताना नव्या सरकारवर टीका केली. तर, मुनगंटीवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – शिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

राज्यातील जनतेने 2019मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे 161 आमदार निवडून दिले. पण त्यावेळी सरकार स्थापन झाले नाही. ज्यांना फक्त खुर्ची माहीत आहे, त्यांना त्याग कधी कळणार?, असा सवाल करून मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेब म्हणाले होते आयुष्यात कधीही काँग्रेससोबत जाणार नाही. बाळासाहेबांचं वचन कुणी मोडले, हे माहीत आहे. हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकले पण शर्जिलवर कारवाई नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आघाडीतील अर्धे लोक रात्री आम्हाला येऊन भेटतात. कुणाचे नाव सांगण्याची गरज नाही. तिकडेच कोण, कधी इकडे येईल काही अंदाज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे तुम्हाला खरा सॅल्यूट. हा सॅल्यूट यासाठी की ते सत्तेत होते. पण सत्तेतून बाहेर पडले तेव्हा भगवा हाती घेतला होता. आठ मंत्री त्यांच्यासोबत आहेत. एक त्याग हा देवेंद्र फडणवीस यांचाही आहे. हा इतिहास होईल, असे त्यांनी सांगितले.

अजित पवारांची मदत
महाविकास आघाडीला एक दिवस सत्तेशिवाय राहता येत नाही. आघाडीच्या नेत्यांमध्ये सत्ता गेल्याची वेदना आम्ही बघत होतो. बहुमताने सरकार आले, पण यांनी रडण्याचा कार्यक्रम सुरू केला, अशी टीका करून, शिंदे आणि भाजपा सरकारची सत्ता आणण्यासाठी अजित पवारांनीही प्रत्यक्ष-अप्रत्य़क्षपणे मदत केली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, असा खोचक टोलाही मुनगंटीवारांनी लगावला.

हेही वाचा – पुन्हा येईन, म्हणालो होतो, पण एकटा आलो नाही; टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांनी झापलं