घरताज्या घडामोडीमुक्ता टिळक यांच्या निधनावरून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका

मुक्ता टिळक यांच्या निधनावरून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका

Subscribe

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या जागेवर लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक असताना आता राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात जहरी टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने देखील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनावरून भाजपवर टीका केली आहे.

कसबा पेठ विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अशातच आता राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपचे उमदेवार हेमंत रासने यांच्यावर टीका केली. हेमंत रासने हे एखाद्या गिधाडासारखे मुक्ता टिळक यांच्या मरणाची वाट पाहत होते, असे वक्तव्य यावेळी अरविंद शिंदे यांच्याकडून करण्यात आले.

कसबा पेठ मतदारसंघात सोमवारी (ता. 13 फेब्रुवारी) महाविकास आघाडीने कॉर्नर सभेचे आयोजन केले होते. या सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, उपसभापती नीलम नीलम गोऱ्हे आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते. याचवेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाषण केले. ज्यावेळी ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर जोरदार टीका केली.

- Advertisement -

यावेळी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, एका चित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पारितोषिक मिळाले होते. ते चित्र साऊथ आफ्रिकेमधील होते. या चित्रात उपासमारीमुळे एक लहान मुलगा मरत होता आणि गिधाड त्याच्या बाजूला बसले होते. गिधाड वाट पाहत होतं की, लहान मुलगा कधी मरेल आणि मी कधी त्याला खातो. या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला. हा संदर्भ यासाठी देत आहे कारण, मुक्ताताई अडीच वर्षे आजारी असताना अनेक जण भेटायला जात होते. पण भाजपचे काही इच्छूक उमेदवार गिधाडासारखे त्यांच्या मरणाची वाट बघत होते. मुक्ता टिळक यांनी तरतूद केली होती, ती काम थांबवण्याचे काम हेमंत रासने करत होता. हे मी नाही सांगत तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देवेंद्र फडणवीस यांना हे सांगितले. असा उमेदवार तुम्ही देत आहेत, ज्याने ताईच्या मरण्याची वाट पाहिली, असे शैलेश टिळक उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले असल्याचा दावा अरविंद शिंदे यांनी यावेळी केला.

दरम्यान, अरविंद शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरविंद शिंदे यांनी आपल्या वक्तव्यातून थेट हेमंत रासने यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्यामुळे भाजपकडून यावर नेमकी काय भूमिका घेण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची यांवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

कसबा पेठ मतदारसंघात भाजपविरोधात नाराजी
कसबा पेठे मतदारसंघामध्ये भाजपने मुक्ता टिळक यांच्या जागेवर त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी दिली नाही. त्याशिवाय या जागेवर ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणताही ब्राह्मण उमेदवार न दिल्याने या मतदारसंघातील लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपविरोधात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीत भाजपाला शिक्षक मतदारसंघाप्रमाणे पराभव पत्करावा लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – …तर सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -