घरताज्या घडामोडीमोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव; सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल

मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव; सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. काँग्रेसने 135 जागांवर हाताचा छापा पाडत भाजपाचे कमळ फुलू दिले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. काँग्रेसने 135 जागांवर हाताचा छापा पाडत भाजपाचे कमळ फुलू दिले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळ्याचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे’, अशा शब्दांत सामनातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. (Saamana Editorial MP Sanjay Raut Slams BJP And PM Narendra Modi On Congress Win In Karnataka)

कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 65 या आकडय़ावरच लटकला. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून भाजपकडून दक्षिणेतले एकमेव राज्य हिसकावून घेतले. देशात 2024 साली काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव ठरलेलाच होता. मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली. काँग्रेस कर्नाटकात एकसंध होती. नेत्यांत मतभेद असले तरी त्यांनी ते निवडणुकीच्या दरम्यान उघड केले नाहीत.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा ज्यांना होती असे डी. शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी ‘हायकमांड’वर सर्वकाही सोपवून प्रचारात झोकून दिले. मुळात कर्नाटकातले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार व लुटमारीच्या प्रकरणात पूर्ण बदनाम झाले होते. शिवाय महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून लोकांना भरकटवत राहिले. मोदी व शहांचा प्रचार व त्यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता. मोदी-शहा या जोडगोळीने आधी ‘हिजाब’चा विषय चालवला, तो फसला. काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीची भाषा करताच मोदी वगैरेंनी ‘हा बजरंग बलीचा अपमान आहे,’ अशी बोंब ठोकून प्रचारात बजरंगबलीस उतरवले.

काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळ्याचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. भाजपचे नकली हिंदुत्व कर्नाटकात अजिबात चालले नाही. मोदी यांच्या नेहमीच्या रडगाण्यास भीक घातली नाही. काँग्रेसने मला आतापर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या, असे अश्रू पंतप्रधान मोदी प्रचार सभांतून ढाळत होते. या रडक्या पंतप्रधानांची प्रियंका गांधी यांनी खिल्ली उडवली. लोकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत, पण मला शिव्या घातल्या म्हणून रडत आहेत, हा प्रचार प्रियंका गांधींनी केला.

- Advertisement -

काँग्रेसने भाजपच्या धोरणांवर, महागाईवर, गॅस सिलिंडरच्या भाववाढीवर भर दिला. कर्नाटकात महिलांनी काँग्रेसला मतदान केले याचे कारण महागाई व प्रियंका-राहुल गांधींचा प्रचार. लोकांना बजरंगबली, हिजाबपेक्षा त्यांचे जीवनावश्यक मुद्दे महत्त्वाचे वाटतात. मोदी व शहांच्या धार्मिक मुद्दय़ांना महत्त्व न देता कर्नाटकने देशाच्या व राज्याच्या प्रश्नांना महत्त्व देऊन निकाल दिला हे महत्त्वाचे. ‘कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर दंगली होतील,’ असा इशारा प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहांनी दिला होता. ही खरे तर धमकीच होती. मात्र त्या धमकीला भीक न घालता कर्नाटकने भाजपचा पराभव केला व भाजपचा पराभव होऊनही कर्नाटक शांत आहे. हा श्री. शहांचा पराभव आहे. पुन्हा भाजपने चालविलेले ‘ऑपरेशन लोटस’देखील कर्नाटकातील जनतेने चिरडून टाकले.

भाजपने सत्तेसाठी फोडलेल्या 18 आमदारांपैकी बहुतेकांना जनतेने आता घरी बसविले आहे. तेव्हा ‘ऑपरेशन लोटस’ घडवून, धमक्या देऊन, धर्मांध प्रचार करून, ईडी, सीबीआयचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावून निवडणुका जिंकण्याचे दिवस आता गेले आहेत. सामान्य माणूस हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट केले.

कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

कर्नाटकात भाजपने विजय मिळवला असता तर त्याचे श्रेय मोदी यांनीच घेतले असते, पण पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे नड्डा यांचे डोके आहे. उत्तर प्रदेशच्या नगरपालिका वगैरे निवडणुकांत भाजपने विजय मिळवला. ज्यांच्या हाती उत्तर प्रदेश ते दिल्लीवर राज्य करतात, असे महाराष्ट्रात फडणवीस सांगत आहेत. ही भाषा म्हणजे कर्नाटकच्या जखमेवर स्वतःच फुंकर मारण्याचा प्रयत्न आहे. हे चुकीचे निदान आहे. कर्नाटकातील दारुण पराभवावर आधी बोला. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस कर्नाटकात जेथे जेथे गेले तेथे भाजपचा पराभव झाला. संपूर्ण सीमाभागात एकीकरण समितीच्या पराभवासाठी भाजपने मराठी बेइमानांच्या फौजा घुसवल्या. एकीकरण समितीचे उमेदवार पाडले, पण भाजपचा पराभव झाला. विषय राहिला उत्तरेचा.

उत्तर प्रदेश वगळता देशातील बहुतेक राज्यांतून भाजपचे उच्चाटन झाले आहे, ते लोकसभेतही होईल. उत्तर प्रदेशात भाजप जिंकलाच (ती शक्यता कमी) तर त्याचे श्रेय योगी महाराजांना जाईल व उत्तर प्रदेशचे भाजप खासदार विरोधी बाकांवर बसतील. त्यांच्या जोडीला फार तर गुजरात असेल, उत्तर प्रदेश व गुजरातच्या पलीकडचा भारत मोठा आहे व त्या भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही! कर्नाटकात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच होईल.


हेही वाचा – धक्कादायक! एका रिक्षात 14 जण; बस अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -