अजित पवारांचा शिवसेनेला पाठिंबा, पण जयंत पाटील म्हणतात…

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. शिवसेनेकडून परस्पर आपल्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची शिफारस केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या नियुक्तीची घोषणा केली. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे.

शिवसेनेने केलेल्या नियुक्तीला आम्ही पाठिंबा देतो

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेत ज्याचे संख्याबळ अधिक त्याचा विरोधी पक्षनेता असतो. विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. राष्ट्रवादी १० आणि काँग्रेसचे देखील १० सदस्य आहेत. आणखी एक सदस्य अपक्ष आहे. परंतु तो शिवसेनेच्या बाजूचा आहे. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नियुक्तीला आम्ही पाठिंबा देतो. यावर आता वाद घालत बसण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिली आहे.

दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर…

विरोधी पक्षनेते अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. पण त्यासंदर्भात अशी काहीही चर्चा आमच्यासोबत झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यासोबत पत्र देण्याआधी चर्चा केली होती. पण जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे. त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो, अशी पुर्वीपासूनची परंपरा आहे. इतरांचा पाठिंबा विरोधी पक्षनेता घेण्याचा प्रयत्न करतो, असं जयंत पाटील म्हणाले.

हे आम्हाला साधं विचारायला तयार नाहीत

विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला. विधान परिषद नेता आम्हाला हवा होता, त्यामुळे बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला. हे आम्हाला साधं विचारायला तयार नाहीत. आमच्याशी बोलायला तयार नाहीत, असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, एकीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून वाद सुरू असताना दुसरीकडे विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर ठाकरे गटाला संधी देण्यात आली नाही. त्यामुळं आता विधीमंडळाच्या अधिवेशनावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वादाचा तिसरा अंक सुरु झाला आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या आमदारांना कामकाज सल्लागार समितीवर घेण्याचं टाळलं – जयंत पाटील