ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल

कालपर्यंत ठाकरेंसोबत असणारे आमदार संतोष बांगर आज एकनाथ शिंदे गटात जाऊन मिळाले आहेत. ते आज सकाळी विधानभवनात जाताना बंडखोर आमदारांच्या बसमध्ये चढताना दिसले.

santosh bangar

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून शिवसेनेला रोज नवनवे धक्के बसत आहेत. काल रात्री उशिराने शिवसेनेचा अधिकृत गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिल्यानंतर आज पुन्हा एक धक्का बसला आहे. कालपर्यंत ठाकरेंसोबत असणारे आमदार संतोष बांगर आज एकनाथ शिंदे गटात जाऊन मिळाले आहेत. ते आज सकाळी विधानभवनात जाताना बंडखोर आमदारांच्या बसमध्ये चढताना दिसले. (Another MLA Santosh Bangar joins Shinde group)

हेही वाचा – गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ३९ आमदार होते. या आमदारांनी काल भाजप उमेदवार राहूल नार्वेकर यांना मत देऊन विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केल्यानंतरही शिंदे गटातील आमदारांनी भाजप उमेदवाराला मत दिले. त्यानंतर काल उशिराने शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विधिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी; आमदारांच्या अपात्रतेवरून संघर्षाची शक्यता

शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदे गटासोबत आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतरही ठाकरे गटातील आमदार शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ठाकरे गट आता धोक्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४० आमदार झाले आहेत.

दरम्यान, ठाकरे यांच्या जवळचे सर्वच आमदार आता शिंदे गटात जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार उदय सामंत यांनीही असाच धक्का देऊन उशिराने शिंदे गटात प्रवेश केला होता. उदय सामंत शिंदे गटात जाण्याआधी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत सहभाग घेतला होता. आपण शिवसेनेतच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, अचानक त्यांनी गुवाहाटी गाठत शिंदेंना पाठिंबा दर्शवला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हेही वाचा – कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? शिवसेनेचा हल्लाबोल