वाहतूक सेवेसाठी जीव धोक्यात घातला; मात्र अद्याप बेस्टचे कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचितच

सर्वसामान्यांना जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा देणारे बेस्ट कर्मचारी अद्याप कोविड भत्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

best

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने दोन वर्षांपूर्वी मुंबईत शिरकाव केला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचे अर्थचक्राला ब्रेक लागला. याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना बसला. ऐक कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. त्यावेळी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवण्यासाठी बेस्टने पुढाकार घेतला होता. त्यावेळी सर्वसामान्यांना जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा देणारे बेस्ट कर्मचारी अद्याप कोविड भत्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

ऐन कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी मार्ग केवळ बेस्ट बस होता. कारण रिक्षा-टॅक्सी चालकांकडून लूटमार होत होती. आधीच रोजगाराचा प्रश्न त्यात आणखी आर्थिक नुकसान नको भीतीने अनेकजण बेस्टने प्रवास करत होते. बेस्टनेही त्यावेळी प्रवाशांसाठी मदतीचा हात दिला होता.

बेस्टचे हजारो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवत होते. त्यावेळी या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, अद्याप बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचाऱ्यांना कोविड भत्त्या मिळालेला नाही.

दरम्यान, सोमवारी कुलाबा येथे झालेल्या बेस्टच्या डिजिटल कार्डच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रलंबित कोविड भत्ता प्रदान करतील अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ ग्रॅज्यूएटी प्रदान करण्यात आली.

२३ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील कोविड भत्ता अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांसारखेच बेस्ट कर्मचाऱ्यांनीही काम केले. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्ण कोविड भत्ता देण्यात आला आहे. मग, बेस्ट कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीव तोडून काम केले आहे त्यामुळे आता बेस्ट कर्मचाऱ्यांना व्याजासकट कोविड भत्ता मिळणे अपेक्षित आहे अशी कर्मचारी वर्गाची मागणी आहे.

बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जून २०२०पर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही आजही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित आहेत.


हेही वाचा – corona updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद