गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाला गती, प्रवीण दरेकरांच्या हस्ते २७ मे रोजी ‘राकेश’ सोसायटीचे भूमिपूजन

pravin darekar

प्रबोधनकार ठाकरे नगर चारकोप, कांदिवली येथील ‘राकेश’ सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २७ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून स्वयंपुनर्विकासाला राजाश्रय दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळेच स्वयंपुनर्विकास वेगाने गती घेतोय. १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को हॉल येथे आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांची भव्य परिषद पार पडली. या परिषदेला गृहनिर्माण संस्थांच्या सभासद, प्रतिनिधिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या परिषदेत मुंबईकरांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. महत्वाच्या घोषणाही करण्यात आल्या. त्याचबरोबर या सहकार परिषदेत मुंबई बँकेला नोडल एजन्सी जाहीर केल्यामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांची रिघ लागली आहे. त्याचाच एक भाग कांदिवली (पश्चिम) येथील ‘चारकोप राकेश’ गृह संकुलाने स्वयंपुनर्विकासांतर्गत पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाला एकूण खर्च ४७.८१ कोटी येणार असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून १० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

चारकोप राकेश संकुलाचा शनिवारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मा. नगरसेविका संध्या दोशी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक आणि संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पवार, सचिव मिथुन लाडे आणि खजिनदार राकेश दळवी यांनी केले आहे.


हेही वाचा : अजित पवार अन् जयंत पाटील वाद? असंतोषाचे पाणी मुरत असल्याची चर्चा