श्रेय घेण्यासाठी निर्णय रद्द करून पुन्हा घेतला, नामांतराच्या मुद्यावरून खैरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं होतं. मात्र, दुसऱ्या बैठकीत हा निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. परंतु नामांतराचा निर्णय या बैठकीत पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंबादमधील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

श्रेय घेण्यासाठी निर्णय रद्द करून पुन्हा घेतला

चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारने आमच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परंतु टीकेनंतर त्यांना हा निर्णय पुन्हा घ्यावा लागला आहे. १९८८ पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारनं केंद्रातून लवकर मंजुरी आणावी. तोपर्यंत आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. त्यामुळे सरकारने एका महिन्यात केंद्रातून मंजुरी मिळावी, अन्यथा फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

शिवसेनेची शिंदे सरकारवर टीका

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत तीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये सामान्य जनतेच्या कामांबाबत निर्णय घेण्यात आले. मात्र, दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. मात्र, आजच्या बैठकीत पुन्हा एकदा शिंदे-भाजप सरकारची तिसरी बैठक पार पडली. यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पूनर्निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, श्रेय घेण्यासाठी निर्णय रद्द करून पुन्हा घेतला असल्याची टीका शिवसेनेकडून केली जात आहे.


हेही वाचा : शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज