घरमहाराष्ट्रप्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशनची CID चौकशी; CBI चौकशीला नकार, भाजपचा सभात्याग  

प्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशनची CID चौकशी; CBI चौकशीला नकार, भाजपचा सभात्याग  

Subscribe

तुम्ही गेली पाच वर्ष मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असता तर बरे झाले असते, असा टोला लगावला. यावेळी फडणवीस यांनी आपल्या आरोपाचे प्रकरण सीबीआयकडे न दिल्याचा निषेध करत सभात्याग केला. त्याचवेळी याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला.

मुंबईः भाजपचे जळगाव जिल्ह्यतील नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना  मोक्काखाली  अडकविण्याचा आरोपाच्या पुष्ट्यार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेनड्राईव्ह  आणि त्यातील स्टिंग ऑपरेशनची गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे पाच वेळा आमदार झाले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात ते आवाज उठवत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी जुने प्रकरण उकरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत वळसे पाटील यांनी फडणवीस यांना तुम्ही गेली पाच वर्ष मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असता तर बरे झाले असते, असा टोला लगावला. यावेळी फडणवीस यांनी आपल्या आरोपाचे प्रकरण सीबीआयकडे न दिल्याचा निषेध करत सभात्याग केला. त्याचवेळी याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला.

- Advertisement -

विरोधी पक्षाने नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला वळसे पाटील यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तरात त्यांनी भाजपला चांगलेच टोले लगावले. फडणवीस यांनी 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. ते सगळे विधिमंडळाला दिले नाहीत. काही मागे ठेवलेत. तो त्यांचा प्रश्न आहे. हे संपूर्ण प्रकरण तपासावे लागेल. त्यामागे कोण आहे? त्यात कोण दोषी आहे. हे पाहिले पाहिजे. गिरीश महाजन यांनी सरकार षडयंत्र करत आहोत, असा आरोप केला आहे.

याबाबत स्पष्टता देताना वळसे पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा मराठा प्रसारक मंडळ या संस्थेत वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे, याचा तपास सुरू आहे. याबाबत भोईटे आणि पाटील यांच्यात वाद सुरू असून, आतापर्यंत 29  अरोपींना अटक झाली आहे. पोलीस संरक्षणात या संस्थेचे कामकाज सुरू आहे. यामध्ये धमकविण्याची  घटना पुण्यात घडली असून, यामध्ये महाजन यांचे नाव घेतले आहे. म्हणून गुन्हा पुणे येथे नोंद झाला आहे.

- Advertisement -

प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्‍य सरकारने तो मंजूर केला असल्‍याचे सांगताना वळसे पाटील म्‍हणाले, या प्रकरणी मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे दोषी असतील त्‍यांना शिक्षा होईल. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रिपदही तुमच्याकडेच होते. पोलिसांचा एका बाजूला अभिमान असल्‍याचे म्‍हणता मग प्रत्‍येक प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी का करता? असा सवाल वळसे पाटील यांनी केला.

पोलिसांची 7 हजार 231 पदे भरणार

पोलीस दलातील 5 हजार 297 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आणखीन 7 हजार 231 जागांची भरती करण्यास राज्‍य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, ती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राजकीय आंदोलनातील खटलेही मागे घेण्याचा तत्त्वतः निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून, त्‍याचे प्रस्‍ताव आयुक्‍त आणि जिल्‍हाधिकारी यांच्याकडून जसजसे येतील तसतसे त्‍याबाबत न्यायालयात निर्णय होतील, असेही वळसे पाटील म्‍हणाले.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोपी सचिन वाझे याच्या तक्रारीवरून कारवाई झाली. त्यानंतर देशमुख आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर ईडी, इन्कम टॅक्‍सच्या एक दोन नाही तर 90 धाडी घालण्यात आल्‍या. एखाद्याला जर संपवायचे असेल तर यंत्रणांचा कशा पद्धतीने वापर करण्यात येतो याचे हे उदाहरण असल्‍याचेही वळसे पाटील म्‍हणाले. पक्षाचा एक प्रवक्‍ता आदल्‍या दिवशी जाहीर करतो की, यावर धाड पडणार, यांना अटक होणार आणि दुस-या दिवशी कारवाई होते. जणू काही प्रवक्ते आणि केंद्र सरकारची यंत्रणा यांच्यात हॉटलाईन आहे, असा टोला वळसे पाटील यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात पुण्याच्या तत्‍कालीन पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांनी कशा प्रकारे राजकीय नेत्‍यांचे फोन टॅप केले तो विषयही वळसे पाटील यांनी काढला. नाना पटोले, बच्चू कडू यांना अंमली पदार्थ विक्री करणारे दाखविण्यात आले. नाना पटोले यांना अमजद खान तर बच्चू कडू यांचे नाव निजामुददीन बाबू शेख असे ठेवण्यात आले. इतकेच नाही तर भाजपच्या संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार आणि आशीष  देशमुख यांचा एक फोन रघू चोरगे आणि दुसरा फोन हिना महेश साळुंखे या स्‍त्रीच्या नावाखाली टॅप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्‍य विभाग, म्‍हाडा, टीईटी विभागातील पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्‍यातील बहुतांश आरोपींना पकडण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. पुढच्या परीक्षा प्रक्रिया पूर्ण पारदर्शी पद्धतीने होतील, याची काळजी घेण्यात येत असलयाचेही वळसे पाटील म्‍हणाले. राज्यात अनेक प्रकारचे आंदोलने होतात. आरक्षण किंवा अन्य विषयावर आंदोलने होतात. कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणावर शासनाच्या नियमाचा भंग झाला होता. यावेळी राजकीय आंदोलनाचे कलम 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व खटले मागे घेण्याचा तत्त्वतः निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

जळगावमधील बीएचआर घोटाळ्याची चौकशीबाबतचा विषयही वळसे पाटील यांनी काढला. या घोटाळ्यात 26 आरोपी असून, त्याची चौकशी 2016 सुरू झाली आहे. जळगावमधील दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करायचा की नाही? पोलिसांच्या तपासात सत्य समोर येऊन गिरीश महाजन त्यात निर्दोष राहिले तर या सर्व प्रकाराचा आनंद मला सर्वाधिक होईल, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचाः सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा मात्र CID मार्फत तपास करणार, दिलीप वळसे पाटलांची माहिती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -