घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : वर्षावर राजकीय बैठक नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयाचा आयोगाकडे खुलासा

Lok Sabha 2024 : वर्षावर राजकीय बैठक नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयाचा आयोगाकडे खुलासा

Subscribe

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर राजकीय बैठका होत असून हा निवडणूक आचारसंहिता भंग असल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत वर्षा निवासस्थानावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाने खुलासा मागितला होता. वर्षावर राजकीय बैठक झाली नाही, जे फोटो तक्रारीसाठी टि्वट करण्यात आले होते, ते जुने फोटो आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका घेतल्या जात असून हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार सचिन सावंत यांच्याकडून एक्स या समाज माध्यमाद्वारे करण्यात आली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने वर्षा निवासस्थानावरील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना, अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक आयोगाला सुनावले

मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशानंतर आता निवडणूक आयोग तक्रारदार सचिन सावंत यांच्याकडून याबाबत पुरावे मागणार आहे. बैठकांचे त्याच दिवसांचे आणखी काही फोटो असतील तर ते पाठविण्यात यावेत, असे तक्रारदारांना सांगण्यात आल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.

- Advertisement -

सत्य नाकारणे यासारखे दुर्दैव नाही – सचिन सावंत

वर्षा निवासस्थानी आचारसंहितेच्या काळात राजकीय बैठका सुरू होत्या, याची तक्रार मी निवडणूक आयोगाला केली होती. पण, अशा बैठका झाल्याच नाहीत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने माध्यमांद्वारे निवडणूक आयोगाला कळवले आणि निवडणूक आयोग माझ्याकडे पुरावे मागणार आहे, असे समजले. निवडणूक आयोगाने मला अद्याप काही कळवलेले नाही. परंतु सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये या बैठकांचे विवरण दैनंदिन स्वरूपात करण्यात आले होते. खुलेआम सार्वजनिक असलेले पुरावे माझ्याजवळ मागण्यात काय अर्थ आहे. तरीही या आमदारांनी स्वतः केलेले ट्वीट पाहावे. प्रसारमाध्यमे तसेच ट्वीटमध्ये समोर आलेले सत्य नाकारणे यासारखे दुर्दैव नाही, अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -