…तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही आले नसते, रामदास कदमांचा दावा

Ramdas Kadam

मुंबई : शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सक्रिय आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी ‘उठाव’ करण्याचे पाऊल उचलले नसते तर, पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते, असा दावा माजी मंत्री रामदास कदम यांनी केला. हे विधान आपण पूर्णपणे जबाबदारीने करीत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

राष्ट्रवादीसाठी अजित पवार यांनी राज्याचा खजिना लुटला, असा थेट आरोप रामदास कदम यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात तसेच आजारपणामुळे मंत्रालयात जात नव्हते. याचाच फायदा घेऊन प्रशासकीय ज्ञान असलेले अजित पवार सकाळी सात वाजता मंत्रालयात जात होते. शिवसेनेचे आमदार जिथे आहेत, त्या मतदारसंघातील पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला निधी दिला जात होता, असा दावाही त्यांनी केला. माझ्या मुलाच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला १० कोटींचा निधी दिला. माझ्या मुलाची जी अवस्था आहे, ती शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘अग्निपथ’शी संबंधित सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग

गेली ५२ वर्षे संघर्ष करून शिवसेना आम्ही उभी केली आणि आता वयाच्या सत्तरीला राजीनामा देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते. राजीनामा दिल्यानंतरही माझी हकालपट्टी करण्यात आली. किती लोकांची तुम्ही हकालपट्टी करणार? तुमच्या आसपास कोण लोक आहेत, शरद पवारांची माणेस आहेत का ते पाहा. त्यांची हकालपट्टी आधी करा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. हे सांगताना ते भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

उद्धव ठाकरे म्हणाले होते, भाजपाने शिवसेनेला २५ वर्षं सडवले. पण राष्ट्रवादीने अडीच वर्षांत शिवसेनेची वाट लावली त्याचे काय? पक्ष फुटत आहे तरी उद्धव ठाकरेंना शरद पवार का हवेत? कोणाचा हट्ट आहे, हे ठाकरेंनी ओळखावे. अजून वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी. आजूबाजूला जे पक्षद्रोही बसले आहेत, त्यांच्या मुळावर घाव घालावा, असे सांगून, उद्धव ठाकरे यांनी देखील दोन पावले मागे येऊन एकनाथ शिंद यांना साद घालावी, असे आवाहन रामदास कदम यांनी केले.

हेही वाचा – नुपूर शर्मा प्रकरणाचे बिहारमध्ये पडसाद; तरुणाला चाकूने भोकसले